' तू मला आवडतेस ', असं म्हणत विवाहितेवर अत्याचार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
By शीतलकुमार कांबळे | Updated: June 19, 2024 18:31 IST2024-06-19T18:31:33+5:302024-06-19T18:31:50+5:30
आरोपीचे अगोदरच लग्न झालेले असल्याने त्यास लग्नास नकार दिला होता. तरीही तो संबंध ठेवण्यासाठी पीडितेस वेळोवेळी धमकावत होता.

' तू मला आवडतेस ', असं म्हणत विवाहितेवर अत्याचार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
मंगळवेढा : तू मला फार आवडतेस, तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत एका २६ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी संतोष राजू क्षीरसागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, पीडितेचा दहा वर्षांपूर्वी लग्नाअगोदर आरोपी हा मित्र असून त्यांचे मैत्रीचे संबंध होते. लग्नानंतरही ते दोघे एकमेकांना भेटत होते. हे पीडितेच्या पतीस कळाल्यावर पीडिता ही माहेरी आईकडे राहण्यास आली होती. या दरम्यानच्या कालावधीत आरोपी हा वारंवार फोन करून व समक्ष भेटल्यानंतर तू मला फार आवडतेस, तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत होता.
आरोपीचे अगोदरच लग्न झालेले असल्याने त्यास लग्नास नकार दिला होता. तरीही तो संबंध ठेवण्यासाठी पीडितेस वेळोवेळी धमकावत होता. पीडितेच्या घरातील आई, भाऊ हे बाहेर गेल्यानंतर पीडिता एकटी असताना आरोपीने घरी येऊन तू माझ्याशी संबंध ठेव, मी कोणाला सांगणार नाही, असे म्हणून हात ओढून जबरदस्ती करू लागला. तेव्हा त्यास फिर्यादीने विरोध केला. संबंध न ठेवल्यास तुझ्या भावाला व आईला मारून टाकेन, अशी दमदाटी करीत अत्याचार केला.
पीडितेने जोराचा आरडाओरडा करताच शेजारी असणारे लोक धावून आले व पीडितेची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. लोकांना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.