धक्कादायक! बार्शीत व्यापाराच्या घरावर ८ ते १० जणांचा सशस्त्र हल्ला
By विठ्ठल खेळगी | Published: March 2, 2023 01:28 PM2023-03-02T13:28:08+5:302023-03-02T13:28:31+5:30
इंदिरानगर भागात राजेश मुकणे व विठ्ठल शिंदे हे दोघे शेजारीच राहतात. मागील आठवड्यात शिंदे आणि मुकणे यांच्यात रस्त्यावरील झाडांच्या व गटार करण्याच्या कामावरून किरकोळ भांडणे झाली होती
सोलापूर/बार्शी - दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन वाहनांमधून आलेल्या ८ ते १० जणांनी एका कृषी कंपनीच्या मालकाच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. बुधवारी रात्री साडेआठ वाजता शहरातील कासारवाडी रोडवरील इंदिरानगरात हा प्रकार घडला. जमावाने परिसरात दहशत पसरवली आणि घरातील साहित्याची नासधूस करीत महागड्या असलेल्या चारचाकी गाड्यांची तोडफोडही केली.
इंदिरानगर भागात राजेश मुकणे व विठ्ठल शिंदे हे दोघे शेजारीच राहतात. मागील आठवड्यात शिंदे आणि मुकणे यांच्यात रस्त्यावरील झाडांच्या व गटार करण्याच्या कामावरून किरकोळ भांडणे झाली होती. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पुन्हा दोन्ही कुटुंबात भांडण झाले. शिंदे कुटुंबातील सदस्यांनी मुकणे यांना मारहाण केली. जखमी मुकणे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे मुकणे यांच्या घरात त्यांच्या आई, बहीण, मुलगी आणि घरातील मोलकरीण या चौघीच असताना रात्री साडेआठ वाजता ८ ते १० जण दोन वाहनांमधून आले आणि कोयता, कुऱ्हाड, लाकडी स्टिक, रॉड आदी शस्त्रांसह राजेश मुकणे यांच्या घरात घुसून हल्ला चढवला. यात मुकणे यांची बहीण आणि कामवाली बाई या दोघी जखमी झाल्या.
पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सपोनि ज्ञानेश्वर उदार, शिवाजी जयपत्रे, महारुद्र परजने, पीएसआय प्रवीण शिरसट, कर्नेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मोठा पोलिस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता.