आषाढी वारी; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालतात ४ लाख वारकरी
By Appasaheb.patil | Published: July 13, 2024 05:47 PM2024-07-13T17:47:48+5:302024-07-13T17:52:29+5:30
आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे येत आहे.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : 'हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा-ताणाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे. आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे येत आहे. दरम्यान, पालखी सोहळ्यासोबत किमान चार लाख वारकरी पायी चालत आहेत.
दरम्यान, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम अकलूज येथे होता. सर्व सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या होत्या. आज शनिवारी सकाळी पालखी अकलूज येथून पंढरपूरच्या दिशेने निघाली. नातेपुते येथे पालखीचे दिमाखात स्वागत करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी हजारो भाविकांची एकच गर्दी केली होती. जेसीबीमधून पुष्पवृष्टी करीत पालखीचे स्वागत करण्यात आले. माऊली...माऊली चा गजर सर्वत्र घुमू लागला होता.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पहिला मुक्काम नातेपुते नगरपंचायत येथे असतो. पालखीतील वारकऱ्यांना अत्यंत चांगल्या सोयी सुविधा देण्यात येत आहेत. पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता, मुक्कामाची चांगली सोय, जेवण आदी विविध सेवासुविधा प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येत आहेत. संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. बुधवारी आषाढीचा मुूख्य सोहळा पार पडणार आहे.