मोठी बातमी; चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात मंडप उडाला; भर पावसात महिलांना दिला पुरस्कार
By Appasaheb.patil | Published: July 6, 2024 04:06 PM2024-07-06T16:06:58+5:302024-07-06T16:08:53+5:30
भर पावसात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत मेळाव्यातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरातील एका कार्यक्रमाप्रसंगी जोरदार वादळी वार्यामुळं मंडप उडून गेला. या घटनेमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, भर पावसात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत मेळाव्यातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
सोलापूर शहरातील सेटलमेंट ग्राउंड, लिमयेवाडी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना व विद्याथींनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल कृतज्ञता समारंभ आयोजित कार्यक्रमाप्रसंगी हा प्रकार घडला आहे. याचवेळी भर पावसात १ हजार विद्यार्थींनींना शालेय साहित्य व पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मागील काही दिवसांपासून सोलापुरात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागत होती.
शनिवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या अचानक वादळी वारा जोरात सुरू झाला. त्यानंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं कार्यक्रमात थोडा गोंधळ उडाला. दरम्यान, भर पावसात उपस्थित महिलांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.