सोलापूर जिल्ह्यात बाप्पाच्या भावपूर्ण निरोपासाठी तीन हजार पोलिसांचा फौजफाटा
By विलास जळकोटकर | Published: September 27, 2023 05:14 PM2023-09-27T17:14:36+5:302023-09-27T17:14:44+5:30
१८२७ ‘श्रीं’चे उद्या विसर्जन : पंढरपूर, अक्कलकोट, बार्शीत सीसीटीव्हीद्वारे नजर
सोलापूर : मोठ्या जल्लोषामध्ये वाजत-गाजत घरोघरी आणि सार्वजनिक मंडळाच्या मंडपात विराजमान झालेल्या गणपतीबाप्पाच्या निरोपाची वेळ येऊन ठेपली आहे. बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात ३ हजार १९२ पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. पंढरपूर, अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची करडी नजर असणार आहे. उद्या (गुरुवारी) जिल्ह्यात १८२७ ‘श्रीं’च्या मूर्तींची विसर्जन होणार आहे.
सोलापूर शहरासह जिल्ह्यात १९ सप्टेंबर रोजी (मंगळवारी) ढोल, ताशा, लेझीमच्या तालामध्ये ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या काळात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांद्वारे तसेच प्रबोधनात्मक देखावे सादर केले. उद्या (गुरुवारी) ‘श्रीं’चे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत आहे. तत्पूर्वी काही मंडळांनी पाच दिवसांनी तर काहींनी बुधवारी विसर्जन केले.
तीन तालुक्यांवर सीसीटीव्हीचा वॉच
जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट येथील ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पुरेशी कुमक गावागावांमध्ये देण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
असा आहे फौजफाटा
डीवायएसपी : ०७
पोलीस निरीक्षक : २९
सपोनि/ पीएसआय : १०६
पोलीस : १६००
न्यायप्रविष्ठ पोलीस : १५०
२ एसआरपी तुकडी : २००
होमगार्ड : ११००