सोलापूर जिल्ह्यात ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले; पाऊस चांगला पडला तर गाळपाची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 03:38 PM2022-06-29T15:38:24+5:302022-06-29T15:38:30+5:30
सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा ...
सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा परिणाम ऊसवाढीवर नक्कीच होत असला तरीही सरत्या गाळप हंगामाप्रमाणेच उच्चांकी गाळप जिल्ह्यात होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत आहे. २००० नंतर एकापाठोपाठ एक असे साखर कारखाने उभारणी झाले. उजनी धरण तसेच गरजेनुसार विविध ठिकाणी झालेले मध्यम, साठवण व लघु तलाव, ओढे-नाल्याची खोदाई व त्यावरील बंधारे, याशिवाय जिल्हाभरात झालेल्या पाणी अडविण्याच्या कामामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळेच ऊसक्षेत्रात वरचेवर वाढ होत आहे. यामुळेच सरत्या हंगामात ३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालला व राज्यात उच्चांकी गाळपाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली.
पुढील वर्षाच्या गाळपासाठी बंद असलेल्यापैकी एक- दोन साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. यापुढेही पाऊस चांगला पडत राहिला तर उसाची वाढ जोरात होईल व टनेज वाढेल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
म्हणूनच ऊस लागवडीकडे कल
ढोबळी मिरची फेकून द्यावी लागली, द्राक्ष जागेवरच टाकावी लागली, टोमॅटो, कांदा शेतकऱ्यांना परवडला नाही. ज्वारी, गहू व इतर धान्याचे यापेक्षाही हाल सुरु आहे. मग शेतकऱ्यांनी करायचे तर कोणते पीक?, मागील काही वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव पाहता ऊसतोडणीसाठी थोडा त्रास होईल मात्र बिनबोभाट ऊस जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढलाय. त्यामुळेच जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढत असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
चौकट
वर्ष ऊस क्षेत्र (हे.)
- २०१७-१८ १,५३,५६८
- २०१८-१९ १,०४,०८६
- २०१९-२० १,२८,९७९
- २०२०-२१ १,७१,००१
- २०२१-२२ २,३०,०५०
( दोन वर्षांतील तालुकानिहाय ऊस क्षेत्र हेक्टरमध्ये)
- तालुका २०-२१ २१-२२
- उत्तर सो. ४०.११ ५२.०३
- दक्षिण सो. ११०.६८ ११८.६७
- बार्शी १९.६८ ७३.२०
- अक्कलकोट१८७.९८ २१५.१७
- मोहोळ २७९.७४ २२५.९४
- माढा १७९.४२ ३४९.४७
- करमाळा १९५.८९ ३७३.८७
- पंढरपूर ३२७.२१ ४६२.७८
- सांगोला ३१.४४ ४७.०९
- माळशिरस २३०.२० २५३.७९
- मंगळवेढा १०७.६६ १२८.४०
- एकूण १७१००० २३००००
जिल्ह्यात जलसंधारणची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने व मागील दोन वर्षे पाऊस चांगला पडल्याने जमिनीत पाणी जिरले आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्र ऊस वाढला आहे. यापुढे पाऊस चांगला पडला उसाची वाढ होईल व वजन वाढेल.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी