पगार न मिळाल्याने पत्नीसह पतीने मारली शेततळ्यात उडी; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
By Appasaheb.patil | Published: August 9, 2023 03:56 PM2023-08-09T15:56:43+5:302023-08-09T16:00:09+5:30
घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे राहणाऱ्या व सोलापुरातील खासगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या शिपायाने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
हणमंत विठ्ठल काळे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत हणमंत काळे हे सोलापुरातील एका शाळेत शिपाई म्हणून काम करीत होते. मागील १३ वर्षापासून वेतन न मिळाल्यानं त्यांनी आपली पत्नी, तीन चिमुकल्यासह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मात्र मुलांनी उडी मारण्याआधीच कुटुंबियांनी त्यांना रोखलं तर शिपायाची पत्नी गंभीर असून शहरातील एका खासगी रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केला.