सोलापूरमध्ये मतदार याद्या दुरुस्तीसाठी महापालिका अधिकारी अन् कर्मचारी पुरविणार
By Appasaheb.patil | Published: November 28, 2022 04:40 PM2022-11-28T16:40:09+5:302022-11-28T16:40:36+5:30
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली.
सोलापूर - सोलापूर महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. त्यादृष्टीने शासनाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकारची तयारी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता लवकरच मतदार याद्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर होणार असून, यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयास महापालिकेकडून आवश्यक ते अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी पुरविणार आहोत अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक आयोगाची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. या कॉन्फरन्सला आयुक्त तेली-उगले या हजर होत्या. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे पत्ते चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले आहेत. हे चुकीचे पत्ते व अन्य दुरुस्तीसाठी लवकरच मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून जाहीर होईल. त्यानंतर मतदारयाद्या दुरुस्त करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयास आवश्यक ते महापालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी पुरविण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले.