सोलापुरात सुनबाई न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून तिच्या हातावर ब्लेडने केले वार
By विलास जळकोटकर | Published: September 7, 2023 05:09 PM2023-09-07T17:09:16+5:302023-09-07T17:10:14+5:30
स्नेहा यांच्या सासूने राहत्या घरी रात्री सातच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सोलापूर : न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून पतीने हात पकडला आणि सासूने ब्लेडने तिच्या हातावर मारुन जखमी केले. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन सासूसह पतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. विडी घरकूल येथे ही घटना घडली.
या प्रकरणी स्नेहा गिरीधर टंकसाळ (वय- २४, रा. तुळशांती नगर, विडी घरकूल, सोलापूर) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार सासू सरस्वती रामचंद्र टंकसाळ व पती गिरीधर रामचंद्र टंकसाळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी स्नेहा ही सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कार्यक्रमाला गेली होती. यावरुन स्नेहा यांच्या सासूने राहत्या घरी रात्री सातच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर स्नेहाला तिचा पती गिरीधर याच्यासमोर उभे करुन विचारणा केली. पतीनेही ‘तु मला न सांगता कुठे गेली होती. तू घर सोडून बाहेर का गेली’ असे म्हणत मारहाण केली. पतीने स्नेहाचा हात पकडला, सासूने घरात असलेली दाढीची ब्लेड तिच्या डाव्या हातावर, मनगटावर मारुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकाराबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून स्नेहाने पती व सासू विरोधात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.