सोलापुरात जबरदस्तीनं दोन हजार रुपये वर्गणी मागितल्याचा गुन्हा
By विलास जळकोटकर | Published: April 13, 2024 06:46 PM2024-04-13T18:46:45+5:302024-04-13T18:46:56+5:30
पावती घ्यावीच लागेल धमकी : दोघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : वर्गणीसाठीची दोन हजार रुपये रक्कमेची पावती फाडून ती तुम्हाला घ्यावीच लागेल, अशी धमकी देण्याचा प्रकार सत्तर फूट रोड समर्थ ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात घडला. या प्रकरणी शशिकांत बाबुराव पगडे यांनी फिर्याद दिल्याने सदर बझार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
राम अशोक जाधव, नागेश प्रकाश इंगळे (रा. सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी सकाळी १०:४५ च्या सुमारास सत्तर फूट रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये बसलेले होते. यावेळी नमूद आरोपी १ हा छत्रपती शाहू महाराज मागासर्गीय बहुउद्देशीय संस्था हुडको नं. ३ कुमठा नाका सोलापूरचे संस्थापक आरोपी २ यांच्या वतीने दुकानात आला. त्याने फिर्यादीच्या नावे २ हजार रुपयांची पावती फाडली. व ती तुम्हाला घ्यावीच लागेल, अशी धमकी दिली आणि पावती जबरदस्तीने ठेवून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास फौजदार शिंदे करीत आहेत.