दुसऱ्या गोल रिंगणासाठी खुडुस नगरीत धावले अश्व; उडीचा खेळ अन् फुगडीनं परिसराला प्राप्त झाले चैतन्य
By Appasaheb.patil | Published: July 13, 2024 05:26 PM2024-07-13T17:26:23+5:302024-07-13T17:28:19+5:30
पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण आज माळशिरस तालुक्यातील खुडुस येथे पार पडले.
आप्पासाहेब पाटील,माळशिरस : पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण आज माळशिरस तालुक्यातील खुडुस येथे पार पडले. अश्वांनी दोन फेऱ्या मारल्या तेव्हा भाविकांनी माऊली माऊलीच्या गजराने आसमंत दुमदुमला. अश्वांनी गोल रिंगण फेरी पूर्ण करताच उपस्थित वारकऱ्यांनी घोडयाच्या पायाखालची माती उचलण्यासाठी एकच धावपळ केली. त्यानंतर उडीचा खेळ, फुगडी अशा खेळांनी परिसराला चैतन्य प्राप्त झाले होते.
सकाळी ९.०५ वाजता विविध फुलांच्या रंगसंगतींने सजविलेल्या चांदीच्या रथातील पालखीचे आगमन झाल्यानंतर खुडूस ग्रामपंचायतीच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच विनायक ठवरे, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी सरपंच शहाजी काका ठवरे, माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे, वस्ताद महादेव ठवरे व ग्रामस्थांनी स्वागत केले.
माऊलीचा अश्व व स्वराचा अश्व वारकरी मैदानात दाखल झाले. त्याच्या पाठोपाठ पताकाधारी व माऊलीच्या मुख्य रिंगण सोहळा सुरू झाला. चोपदारानी अश्वाला रिंगण दाखविले. सकाळपासून रिंगण सोहळा पाहण्यासाठी आसुसलेल्या भविकांच्या नजरा आता माऊलीच्या अश्वाकडे लागल्या इतक्यात स्वराचा अश्व रिंगणात दाखल झाला अन् माऊलीच्या जयघोषाने व टाळ्यांंनी आसमंत दणाणून गेला होता.