स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सिंधुदुर्ग प्रथम, सोलापूर व्दितीय तर सांगलीने पटकाविला तृतीय क्रमांक
By Appasaheb.patil | Published: October 31, 2022 05:39 PM2022-10-31T17:39:46+5:302022-10-31T17:39:52+5:30
सोलापूर लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२२ मध्ये सोलापूर जिल्ह्याने देशात चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने १ हजार गुणांपैकी ९५५.५३ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग तर तृतीय क्रमांक सांगलीने पटकाविला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वच्छ सुंदर शाळा तसेच स्वच्छतेबाबत विविध उपक्रम हाती घेतले होते. जिल्ह्याने देशात पहिल्या टॉप ५० मध्ये स्थान पटकाविले आहे. देशात एकूण ७०९ जिल्हे आहेत. १००० गुणापैकी ९५५.५३ गुण सोलापूर जिल्ह्याने प्राप्त केले आहेत. नुकताच केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालयाने अहवाल प्रकाशित केला आहे. देशात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव झालेला सिंधुदुर्ग जिल्हा गुणांकनात देशात दहावा आहे. राज्यात सिंधुदुर्ग पहिला, सोलापूर द्वितीय, आणि सांगली तृतीय मिळाले आहेत. फिडबॅकमध्ये सोलापूर जिल्हा देशात द्वितीय आहे. मात्र यंदापासून फिडबॅकसाठी देण्यात येणार पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाने बंद केला आहे.
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनसाठी परसबागा, शोषखड्डे, स्वच्छ व सुंदर शाळेमुळे शालेय स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापन अशा एक हजार गुणांचे रॅंकिंग होते.