नागरिक कार्यालयात, तहसिलदार-नायब तहसिलदार गेटच्या बाहेर!
By संताजी शिंदे | Published: April 5, 2023 07:24 PM2023-04-05T19:24:01+5:302023-04-05T19:24:33+5:30
बेमुदत आंदोलन : तहसिलस्तरावरील कामे ठप्प; ग्रेडपेसाठी आंदोलन सुरूच!
संताजी शिंदे
सोलापूर : राजपत्रित वर्ग-२ प्रमाणे आम्हालाही ग्रेडपे देण्यात यावा या मागणीसाठी तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रकारामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. नागरिक कार्यालयात जातात, तेव्हां त्यांना साहेब गेट बाहेर सुरू असलेल्या आंदोलनात आहेत असे सांगितले जात आहे.
राज्यभरातील दोन हजार २०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदार यांनी ३ एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. राजपत्रित वर्ग-२ नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे देण्यात यावा या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सोलापुरात काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस होता, त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील बरीच कामे ठप्प झाल्याचे निदर्शनास येत आहे. नागरीक आपले काम झाले की नाही, हे पाहण्यासाठी तहसिल कार्यालयात जातात तेव्हां त्यांना तहसिलदारांची सही झाली नाही, ते आंदोलनात आहेत, त्यामुळे काम कधी होईल सांगता येत नाही असे सांगितले जात आहे.
राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग-३ वरून वर्ग-२ असा केला होता. मात्र वर्ग-२ प्रमाणे वेतनवाढ केली नाही. वर्ग-२ साठी ग्रेड पे ४८०० इतका आहे. वर्ग-३ साठी ग्रेडपे ४३०० इतका होता, तो तेवढाच ठेवण्यात आला आहे, त्यात वाढ केली नाही. मागील २५ वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग-२ या पदावर काम करतात. मात्र वर्ग-३ चे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.