सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल!
By दिपक दुपारगुडे | Published: April 21, 2024 07:51 PM2024-04-21T19:51:43+5:302024-04-21T19:52:33+5:30
नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
सोलापूर : करमाळा शहरातील रंभापुरा, सुमंतनगर, बागवान नगर, मुलाणवाडा, नागोबा मंदिर भागात पाच दिवसातून एकदाच पिण्याचे पाणी सुटते आणि तेही पंधरा मिनिटेच. आम्ही तहान कशी भागवणार असा संतप्त सवाल सोनाली तांबे, जयश्रीबाई जाधव, कीर्ती चव्हाण या महिलांनी पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केला. पाणी टंचाई भेडसावत असल्याने या महिला हंडे, घागरी घेऊन नगरपालिका गाठत हल्लाबोल केला. पूर्ण दाबाने सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
करमाळा शहराच्या पश्चिम भागात रंभापुरा व परिसरातील भागात सात हजार लोकसंख्या वस्तीचा भाग आहे. या भागात गेल्या चार महिन्यांपासून पाच दिवसाआड एकदाच तेही अवघे पंधरा मिनिटेच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या भागातील नागरिक हे सर्वसामान्य व मजूर कुटुंबातील आहेत. त्यांना दररोज मजुरीने कामावर जावे लागते, पण पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांना कामावरून घरी बसावे लागत आहे.
रंभापुरा भागातील शिंदेसेनेचे विभागप्रमुख नीलेश चव्हाण यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना थेट भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कमलाकर भोज आंदोलनस्थळी आले. तुम्ही आम्हाला पाणी देत नाही... मग बिल कसे काय वसूल करता ? घरपट्टी कशी मागता ? असा संतप्त सवाल करीत रंभापुरा भागास सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास पालिकेच्या कार्यालयास कुलूप ठोकू असा इशारा दिला.