सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:54 PM2022-07-05T23:54:28+5:302022-07-05T23:57:06+5:30
संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, माझी त्याची ओळख नाय, गेल्यावर सांगणारंय
सोलापूर/मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. गुवाहाटीत असताना त्यांनी रफीक नावाच्या त्यांच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या मित्राला केलेल्या संभाषणातील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... हे वाक्य तुफान गाजलं. अनेकांनी या डायलॉगवरुन मिम्स आणि गाणीही वाजवली. आता, तब्बल 15 दिवसांनी शहाजी बापू पाटील त्यांच्या सांगोला मतदारसंघात परतले आहेत. त्यावेळी मोठ्या जल्लोषात गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. हलगीच्या तालावर, फटक्यांची आतिषबाजी झाली. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार 15 वर्षे टिकणार असे भाकीत केले. तर, भरसभेत संजय राऊतांची नक्कल करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, माझी त्याची ओळख नाय, गेल्यावर सांगणारंय. त्याचं मनगट हलतंय आणि सारखं वर करतंय ह्यों, ह्मं त्यों गेलाय... कापून काढू, प्रेतं आणू... आरं लका कुणाची प्रेतं, कुणाला कापतो, तुझं तुला चालया येईना, असे म्हणत शहाजी पाटील यांनी संजय राऊतांची थेट जाहीर सभेत नक्कल केली. तसेच, सकाळी बशीभर पवं खातंय अन् घरातनं बाहेर पडतंय. झोपताना एक चपाती खाऊन झोपतंय. लका, ये आमच्याकडे कसं बोकाड परपायचं असतंय अन् कोंबडी कशी तोडायची असती मग मनगटात रग येते. ज्याच्या मनगटात रग येते, त्यानेच बोलायचं असतंय, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली.
संजय राऊताने तातडीने बोलणं थांबवावं, तरच ठाकरे घराण्याचा उरलं-सुरलं राहिन. उगं, उद्धव ठाकरेंमुळं त्याला संधी मिळालीय, त्याचा गैरफायदा घेऊ नये. नायतर संजय राऊताने शिवसेना संपविण्याची सुपारीच घेतलीय, अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांवर टिका केली.
हे सरकार 15 वर्षे राहणार
गुवाहाटीच्या दौऱ्यासंदर्भात शहाजी बापूंना प्रश्न केला असता, मी चार-4 महिने घराबाहेर असायचो, माझी बायकोही माझ्या नावानं बोंबलायची. गुवाहाटीला एकनाथ शिंदेंचा मावळा म्हणून मी कालची लढाई करत होतो. पण, आमच्या या लढाईत मी एक सेकंदही विचलित झालो नाही. एकनाथ शिंदेंना पांडुरंग मुख्यमंत्री करणार हे मला माझा देव सांगत होता. शिंदे-फडणवीस सरकार नक्कीच चांगलं काम करेल, असा मला विश्वास आहे. शरद पवारांचा काय आपल्याला नवा अनुभव आहे व्हय, 35 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आपल्याला. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल, पण पुढील 15 वर्षे हेच सरकार राहणार, असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, शहाजी बापू पाटील यांनी आपल्या फोनकॉलमधील संभाषणातही राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली होती. मात्र, मुंबईत आल्यानंतर अजित पवार यांना दरारा आहे, त्यामुळे मी फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनाच तेवढं घाबरतो, असेही ते म्हणाले होते. आता, शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित केल्यानंतर त्यांनी हे सरकार 15 वर्षे सत्तेत राहिल, असे म्हटले आहे.
अजित पवारांनीही विधानसभेत केला उल्लेख
दरम्यान, राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं. त्यामुळे, शिवसेनेतील बंडखोर आमदाराचं हे बंड यशस्वी झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं झाली. तर, अजित पवारांनीही तुफान फटकेबाजी केली. यावेळी, त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या व्हायरल डायलॉगवरही भाष्य केलं होतं. त्यामुळे, शहाजी बापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावरही त्यांचे फॅन फॉलोविंग वाढले आहे. आता, आपल्या गावी आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.