आठवड्यात घरातील दुसरा भाऊही तडीपार! गुन्हेगारी विश्वात खळबळ; दंगे, गुंडगिरीचा आरोप
By रवींद्र देशमुख | Published: April 4, 2024 06:51 PM2024-04-04T18:51:07+5:302024-04-04T18:51:15+5:30
सौदागर क्षीरसागर याला साेलापूर जिल्हा व धाराशीव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
रवींद्र देशमुख/सोलापूर
सोलापूर : शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आठ दिवसात एकाच घरातील दुसऱ्या भावालाही शहर पोलिस आयुक्तालयाने दोन जिल्ह्यातून तडीपार केले. सौदागर सुधीर क्षीरसागर (वय ३२ रा. न्यू बुधवार पेठ, वीरफकीरा चौक सोलापूर) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. सौदागर क्षीरसागर याच्या विरूद्ध २०११ ते २०२३ दरम्यान गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, जीवे ठार मारणे, नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून गंभीर दुखापत करणे.
महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य करणे या सारखे गुन्हे जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या विरूद्ध जोडभावी पेठ पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त (परिमंडळ) यांच्याकडे पाठवला होता.
सौदागर क्षीरसागर याला साेलापूर जिल्हा व धाराशीव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतर त्याला पोलिसांनी निगडी, पिंपरी चिंचवड येथे सोडले आहे. यापूर्वी २६ मार्च रोजी याचा भाऊ सतीश सुधीर क्षीरसागर यालाही दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. आठ दिवसात दोघांना तडीपार केल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.