सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन
By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 29, 2023 07:09 PM2023-04-29T19:09:40+5:302023-04-29T19:10:03+5:30
शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन डॉ. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
सोलापूर : बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समताधिष्टीत समाजाची निर्मिती करून समाज सुधारण्याचे महान कार्य केले. आंतरजातीय विवाह असो अथवा जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार असो त्यांनी त्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन केले. दोन हजार वचने लिहिली, साहित्याची निर्मिती केली, असे महान संत महात्मा बसवेश्वरांचे साहित्य, विचार, वचने नव्या पिढीसमोर आणून या अध्यासन केंद्राचे नाव देशभर करा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी केले.
शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन डॉ. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, बसव साहित्य प्रचारक डॉ. आप्पासाहेब पुजारी, डॉ. बी. बी. पुजारी, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शाह, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अध्यासन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.