केवळ इंधन खर्च भागविण्याइतके मिळतेय एसटीचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:20+5:302021-07-12T04:15:20+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे लालपरीची चाके तब्बल दोन महिने रुतून बसली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला अन् ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे लालपरीची चाके तब्बल दोन महिने रुतून बसली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला अन् सरकारने नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार एसटीला कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करून प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळाली. ७ जूनला सांगोला आगारातून लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली. पहिल्या दिवशी सांगोला आगारातून सोलापूर-अकलूज-पंढरपूर या मार्गावर ९०० किमी एसटी धावली आणि सात फेऱ्यांतून १४० प्रवाशांच्या चढ-उतारामधून आगाराला १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दररोज एसटीच्या फेऱ्या वाढल्याने आगाराच्या उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे.
या मार्गावर धावतेय एसटी
सध्या सांगोला आगारातून मुंबई, पुणे, हैदराबाद, सातारा, अहमदनगर, कराड, पणजी, कोल्हापूरपर्यंत लांबपल्ल्याच्या तर सोलापूर, मंगळवेढा, जत, आटपाडी, अकलूज, पंढरपूर ग्रामीण मार्गावर सांगोला आगारातून दररोज ३७ बसेस ९६ फेऱ्या करून १४ हजार किमी धावतात. त्यामुळे दररोज ६ हजार प्रवाशांच्या चढ-उतारामधून आगाराला तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातून एसटीच्या इंधनाचा खर्च भागविला जातोय, एवढीच जमेची बाब आहे.
शाळा सुरू झाल्यास उत्पन्नात वाढ होईल
ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद आहे त्या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ढालगाव व खवासपूर मुक्कामी बस चालू केल्या जाणार आहेत. सांगोला शहरातील शाळा-महाविद्यालये सुरू नसल्यामुळे ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. शाळा सुरू झाल्यास एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल, असे आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी सांगितले.
कोट ::::::::::::::::
कोरोनाचे संकट टळले नसल्यामुळे एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असला तरी मालवाहतुकीने एसटीला तारले आहे. सांगोला आगारातून दररोज ४ मालवाहतूक बस ४८ रुपये किलोमीटरने धावतात. त्यामुळे इंधन खर्च वजा जाता आगाराला १५ ते १६ हजार रुपये उत्पन्न मिळते, ही जमेची बाजू आहे.
- पांडुरंग शिकारे,
आगारप्रमुख, सांगोला