जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत : धवलसिंह मोहिते-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:50+5:302021-05-29T04:17:50+5:30
जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून शेटफळगढे येथील नवनी मुठा ...
जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून शेटफळगढे येथील नवनी मुठा उजव्या कालव्यात उचलून कि.मी. १६१ येथे खडकवासला स्थिरीकरण सिंचन प्रकल्पाच्या नावाखाली इंदापूर तालुक्याला ५ टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाने दिलेली परवानगी रद्द केली आहे; परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या उजनी जलाशय प्रकल्पावर अवलंबून असलेेेली बार्शी उपसा सिंचन योजना, सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव उपसा सिंचन योजना, भीमा-सीना जोड कालवा, सांगोला उपसा सिंचन योजना, एकरुख उपसा सिंचन योजना, आष्टी उपसा सिंचन योजना, मंगळवेढा ३५ गावांच्या व दक्षिण सोलापूरमधील २२ गावाच्या पिण्याच्या पाणी योजना गेली अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत.
या अर्थवट सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन युद्धपातळीवर कार्यवाही करावी आणि सोलापूर शहर, जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेती सिंचनाचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे आवाहन डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे. याबाबत मुुुुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले आहे.