सोलापूरच्या चालकांची मुंबईमध्ये गैरसोय; तांदूळ आणून भात शिजवून खाल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 02:00 PM2020-05-21T14:00:45+5:302020-05-21T14:04:07+5:30
जेवणाचेही वांधे; सोलापूर विभागातील जवळपास शंभर गाड्या मुंबईला
सोलापूर : कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर काही मजुरांना सोडायचे आहे, असे सांगून सोलापूर आगारातील तेरा एस.टी. गाड्यांना मुंबई येथे पाठवण्यात आले. तेथे गेल्यानंतर जवळपास तीन दिवस होत आले तरी त्या गाड्या मुंबईमध्येच आहेत, तर सेवेसाठी गेलेल्या सोलापुरातील कर्मचाºयांची मुंबईमध्ये गैरसोय होत असल्याची तक्रार कर्मचारी करत आहेत.
प्रवाशांच्या सेवेसाठी सोलापूर आगाराचे कर्मचारी पनवेल येथे गेले. पण तेथे त्यांना जेवणाची व्यवस्था नव्हती. तेव्हा पनवेलच्या चालकांनी जवळपासच्या दुकानातून तांदूळ आणून भात शिजवून खाल्ला, अशी माहिती तेथील कर्मचाºयांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यात अडकलेल्या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. यासाठी एस.टी. प्रशासन खूप प्रयत्न करीत आहे. अशाच पद्धतीने मुंबईमध्ये अडकलेल्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील शेकडो मजुरांना आपल्या घरी पाठवायचे आहे, असे सांगून सोलापूर विभागातील जवळपास शंभर गाड्या मुंबईला मागवून घेण्यात आल्या.
यामध्ये सोलापूर विभागातील गाड्याही रविवारी मुंबईला पाठवण्यात आल्या. यात सोलापूर आगाराच्या तेरा बस पाठवण्यात आल्या. या कर्मचाºयांनी दोन दिवसांचा डबा आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामुळे या कर्मचाºयांनी दोनच दिवसांचे जेवण आपल्या सेबत घेऊन मुंबई गाठले. पण तेथे गेल्यानंतर मात्र यातील काही कर्मचाºयांना बेस्टच्या सेवा बंद आहेत. यामुळे तुम्ही गाड्या चालवण्यास मदत करा, असे सांगण्यात आले.
त्यानंतर अनेक कर्मचाºयांना तेथे राहण्यासाठी आणि जेवणाची कोणतीही सुविधा नव्हती. याचबरोबर हॉटेलही बंद असल्यामुळे कर्मचाºयांची गौरसोय होत आहे. काही वेळेस तर तेथील कर्मचाºयांना तेथील सामाजिक संस्थांच्या मदतीवर अवलंबून रहावे लागत असल्याची तक्रार काही कर्मचारी करत आहेत.
मुंबईला प्रवाशांच्या सेवेसाठी जवळपास शंभर गाड्या गेल्या आहेत. ज्या डेपोमध्ये कर्मचारी जात असतात त्या डेपोच्या वतीने कर्मचाºयांची सेवा करण्यात येते. सोलापुरातील गेलेल्या चालकांना तेथे राहण्याची आणि जेवणाची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
-विलास राठोड, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर