नियोजन नसल्याने एसटी प्रवाशांची गैरसोय; रेल्वे बंद असतानाही आरक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 05:18 PM2021-10-19T17:18:55+5:302021-10-19T17:25:20+5:30
प्रवाशांच्या तक्रारी : दिवाळीपर्यंत गाड्या ऑनलाइन रिझर्व्हेशनची मागणी
सोलापूर : सोलापूरहून पुणे आणि मुंबईकडे रेल्वेने जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण, सध्या रेल्वेगाड्या बंद असूनही एसटी प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे गैरसोय होत आहे, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. तसेच बहुतांश गाड्या अद्यापपर्यंत रिझर्व्हेशनसाठी उपलब्ध नसल्याने प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत.
सध्या जोडून सुटी आल्याने प्रवाशांची गर्दी वाढत आहे. पण, प्रवाशांना आरक्षण करता येत नसल्याने त्यांना आर्थिक ताण सहन करत खाजगी गाड्यांमधून असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. यामुळे एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच रात्री सातारा, कराड या मार्गावर गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. पण अद्यापपर्यंत गाड्या सुरू झाल्या नाहीत.
सोलापूर एसटी स्थानकात नेहमी अस्वच्छता असते. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांवर काही जण झोपलेले असतात. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच परिसरात अनधिकृतपणे पाण्याच्या बॉटलची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. पाण्याच्या बॉटल जादा दराने विकल्या जातात, अशा तक्रारीही प्रवाशांकडून होत आहेत.
कामासाठी वेळोवेळी मुंबईला जावे लागते. पण, एसटी गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध नसल्यामुळे नाइलाजाने ताटकळत प्रवास करावा लागतो. यामुळे या मार्गावर गाड्या उपलब्ध करून द्याव्यात.
- कुमार नरखेडे, प्रवासी
पुण्याहून येणाऱ्यांची संख्या वाढली
सलग सुट्या आल्याने पुण्यात गेलेले अनेक प्रवासी पुन्हा आपल्या शहराकडे आणि गावाकडे परत येत आहेत. यामुळे आता पुण्याहून येणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढत आहे. अनेक प्रवासी हे आरक्षणाला प्राधान्य देत आहेत.
----
पुणे-हैदराबाद मार्गावर शिवशाही गाड्या
सोलापूर आगारातून बारामाही पुणे आणि हैदराबादसाठी शिवशाही गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांना या मार्गावर उत्तम प्रतिसाद मिळतो. पण, यासोबत यंदा हिंजवाडी, बेळगाव आणि नाशिक मार्गावरही शिवशाही गाड्या सोडण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आरक्षणासाठी ‘शिवशाही’ नाही
आरक्षणासाठी शिवशाही गाड्यांना मागणी आहे. पण, दुपारी २ नंतर पुण्याला जाणाऱ्या शिवशाही गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. जवळपास दररोज ४० ते ५० प्रवासी शिवशाही, इतर गाड्यांचे आरक्षण करत आहेत. यातील चार ते पाच टक्के प्रवासी परतीचे तिकीटही आरक्षण करत आहेत.
या मार्गावर धावत आहेत रातराणी गाड्या
- करजगी - मुंबई
- वागदरी - मुंबई
- सोलापूर - नांदेड
- सोलापूर - कोल्हापूर
- लातूर - कोल्हापूर