हागणदारी मुक्तीचा नारा देणाऱ्या अक्कलकोट पंचायत समितीत शौचालयाची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:09+5:302021-03-22T04:21:09+5:30
तालुक्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त होण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया करणाऱ्या पंचायत समितीला शौचालय नाही. या ठिकाणी नित्याची गर्दी असते. विविध ...
तालुक्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त होण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया करणाऱ्या पंचायत समितीला शौचालय नाही. या ठिकाणी नित्याची गर्दी असते. विविध कामांनिमित्त ग्रामीण भागांतून दररोज असंख्य लोक येथे येतात. या कार्यालयात शिक्षण, कृषी, आरोग्य, अंगणवाडी, ग्रामपंचायत, बांधकाम, पशुवैद्यकीय विभाग अशा विविध विभागांत कामकाजासाठी लोकांची वर्दळ असते. विविध विभागांत जवळपास पाचशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्याबरोबरच महिला अधिकारी, कर्मचारी येथे कार्यरत आहेत. या लोकांसाठी स्वच्छ असणारी शौचालये, स्वच्छतागृहे नाहीत. या नागरिकांना गैरसोयीना तोंड द्यावे लागत आहे. स्वतःच्या घरात शौचालय बांधा, वापरा म्हणून सक्ती करणाऱ्या पंचायत समितीबाबत मात्र उलटे चित्र आहे.
चार वर्षांपूर्वी अक्कलकोट पंचायत समितीने कोट्यवधी रुपये खर्चून नवी इमारत उभारली. येथे महत्त्वाच्या सेवासुविधा मिळत नाहीत. येथे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हजारो लोकांसाठी एकमेव असलेली मुतारी वर्षानुवर्षे स्वच्छ केली जात नाही. या ठिकाणी जाताना नागरिकांना नाकाला हातरुमाल लावून जावे लागत आहे. अधिकारी यांना जवळच वसाहत असल्याने त्यांना याचा फारसा फरक पडत नाही. सोयीसुविधेच्या अभावामुळे परिसर घाण होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
--
जुन्या इमारतीमागे पूर्वी शौचालय बांधलेले आहे. त्याच्या दुरुस्ती किंवा स्वच्छतेसाठी कोणत्याही प्रकारचा निधी नाही. नागरिकांनी आहे त्या स्थितीत ते योग्यरीत्या वापरावे.
- बी. डी. ऐवळे
सहायक गटविकास अधिकारी
---
पंचायत समितीचा गाव हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न आहे. मात्र स्वत:च्या कार्यालयात सुलभ शौचालय, मुतारीत स्वच्छतेचे अभाव आहे. या गैरसोयीची वरिष्ठांनी दखल घ्यावी.
- मल्लिनाथ भासगी
नागरिक
---
२१ अक्कलकोट पंचायत समिती
अक्कलकोट येथील पंचायत समितीच्या पाठीमागे असलेले अस्वच्छतेचे मुतारी