ग्रामीणमधील कोरोना संसर्गात वाढ; नऊ दिवसात ९७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:07 AM2020-09-10T11:07:00+5:302020-09-10T11:09:36+5:30
इकडे सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाºयांना लागले बदल्यांचे वेध
सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असल्याचे चित्र असताना आरोग्य विभागातील अधिकाºयांना बदल्यांचे वेध लागल्याचे चित्र जिल्हा आरोग्य विभागाच्या कार्यालयातील वातावरणावरून दिसून आले. कोरोना संसर्गाबरोबरच आता मृत्यूमध्येही ग्रामीण भागाने सोलापूर शहराला मागे टाकले आहे. बुधवारी शहरात मृत्यूची संख्या ४३५ तर ग्रामीणमध्ये ४३९ इतकी झाली आहे.
ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ९१६ तर मृत्यूंची संख्या ४३९ इतकी झाली आहे. बुधवारी ग्रामीण भागात ३९४ जण पॉझिटिव्ह आढळले तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर महिन्यात ९ दिवसात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे तर रुग्णांमध्ये ३ हजार २०२ नी वाढ झाली आहे.
बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला तालुक्यात संसर्ग वाढल्याचे चित्र दिसत आहे. बार्शी तालुक्यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे तर त्याखालोखाल पंढरपूर, माढा, अक्कलकोट तालुक्यांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाची सुरुवात मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटपासून झाली, पण आता हे तालुके मागे पडले आहेत.
तालुक्यातील मृत्यू
बार्शी : ११७, पंढरपूर: ७०, माढा: ४७, अक्कलकोट: ४४, माळशिरस: ३८, मोहोळ: २९, करमाळा: २५, दक्षिण सोलापूर: २३, उत्तर सोलापूर: २२, मंगळवेढा: १५, सांगोला: ९.
वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष
महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर आरोग्य मंत्र्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी सोलापुरात धाव घेऊन यंत्रणा लावली. पण आता ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असताना आरोग्य मंत्री व आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी सोलापूरकडे फिरकले नाहीत, अशी तक्रार आनंद तानवडे यांनी केली आहे. जिल्ह्याच्या स्थितीबाबत बैठक घ्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.