गुटखा विक्रेत्यांच्या अडचणीत वाढ; बाराजणांचा जामीन नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:24 AM2021-09-23T04:24:58+5:302021-09-23T04:24:58+5:30
महाराष्ट्र राज्याने गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी यावर १५ जुलै २०२१ पासून बंदी घातली आहे. तरीही पंढरपुरातील काही पानशॉप दुकानदार ...
महाराष्ट्र राज्याने गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी यावर १५ जुलै २०२१ पासून बंदी घातली आहे. तरीही पंढरपुरातील काही पानशॉप दुकानदार पानमसाला गुटखा विक्री करत होते. यामुळे अन्न भेसळ व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाने ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान पंढरपूर शहरात १२ ठिकाणी धाड टाकली.
सुनील ज्ञानेश्वर मोरे, गहिनीनाथ नवनाथ ढेकळे, समीर रशीद बागवान, वासिम यासीन तांबोळी, सूरज मिलनसिंग रजपूत, इम्रान शौकत तांबोळी, गौस जैनुद्दीन तांबोळी, आरिफ मेहबूब सय्यद, किरण राजकुमार माने यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे गुन्हे नोंद केला होता. ८ सप्टेंबर रोजी वरील सर्वांना अटक करण्यात आली. त्यांनी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जास सरकार पक्षातर्फे हरकत घेण्यात आली होती व या गुन्ह्यात आरोपीने हा प्रतिबंधित माल कोणाकडून आणला आहे. यातील जप्त मुद्देमाल हा महाराष्ट्र राज्यात बंदी असल्याने आरोपीने शेजारील राज्यातून माल आणला असावा तो माल पुरविणारा कोण आहे. या गुन्ह्याच्या तपासात असे गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे का? याबाबत तपास चालू आहे. आरोपीस जामीन मंजूर झाल्यास ते या सर्व महत्त्वाचे तपासात अडथळे निर्माण करतील. हा गुन्हा गंभीर आहे.
................
समाजात चुकीचा संदेश जाईल
या पदार्थाचे सेवन केल्यामुळे तरुण मुले व नागरिक कर्करोगासारख्या आजारांना बळी पडू लागल्याने सरकारने या पदार्थाचा साठा, विक्री, वाहतूक यावर बंदी घातली आहे. अशा गंभीर गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊन असे गुन्हे करणारी वृत्ती वाढीस लागणार आहे. असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे केला. त्यानुसार यातील संशयित आरोपींचा युक्तिवाद व तपास कामातील कागदपत्रे याचे अवलोकन करून सर्व संशयित आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर करण्यात आले. यात सरकार पक्षातर्फे ॲड. सारंग वांगीकर यांनी काम चालवले.