कुंभारीच्या अश्विनी रुग्णालयात आणखी बेड वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:44+5:302021-04-14T04:20:44+5:30
------ दक्षिण सोलापूर : तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत याची प्रशासनाने सोमवारी तपासणी केली. ...
------
दक्षिण सोलापूर : तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत याची प्रशासनाने सोमवारी तपासणी केली. अधिकाऱ्यांच्या पथकाने तालुक्यातील कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली.
दक्षिण सोलापूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचारासाठी त्यांना सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. तालुक्यात रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र हॉस्पिटल नाही अशा तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासकीय शिष्टमंडळाने सोमवारी कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.
कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी १०० बेड ठेवण्यात आले आहेत. त्यातील १२ बेड व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांसाठी वापरले जात आहेत. ४३ बेड सध्या रुग्णांसाठी वापरण्यात आले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांना लक्षणे आहेत की लक्षणे नसतानाही बेड अडवून ठेवण्यात आले आहेत. याचीही माहिती या अधिकाऱ्यांनी घेतली.
या प्रशासकीय पथकात प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी राहुल देसाई, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता.
-------
आणखी बेड वाढवण्याच्या सूचना
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोलापूर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सध्या एकाही रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. विशेषतः ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या सुविधा रुग्णांना मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतात असे प्रशासनाला वाटते. त्यामुळे आणखी शंभर बेड वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या.