पुणे जिल्ह्यातील पावसाने उजनी धरणात होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:57 PM2019-07-01T12:57:20+5:302019-07-01T12:59:58+5:30
आनंदाची बातमी; धरणाच्या पाणीसाठ्यात होऊ लागली हळूहळू वाढ
भीमानगर : गेल्या तीन दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव आणि पवना धरणक्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत चालली आहे.
पवना धरण परिसरात गेल्या ४८ तासात २०० मिमी पाऊस झाला आहे तर १ जूनपासून याठिकाणी २७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणात सध्या १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी आजच्या तारखेला २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गेल्या ४८ तासात तब्बल ४७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
सर्वाधिक २०० मि. मी. पावसाची नोंद ही टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली आहे. तर सर्वात कमी सुमारे १०० मिमी पाऊस हा वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे १२२ मिमी पाऊस झाला. रविवारी दिवसभर पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात संततधार सुरुच होती.
या पावसाचा फायदा उजनी धरणाला होतो. कारण पुणे परिसरात पाऊस पडला की ही धरणे भरतात व ओव्हरफ्लो झाला की हे पाणी उजनी धरणात सोडून दिले जाते.
गेल्यावर्षी उजनी धरण परिसरात व सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस होऊन सुद्धा पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीवरील सर्व धरणे भरून उजनीत खडकवासला, पानशेत, टेमघर,भामा आसखेड, पवना या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण ११० टक्के भरले होते. रविवारी दिवसभरात उजनी धरण जलाशय परिसरात ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
उजनी धरणाची सद्यस्थिती
एकूण पाणी पातळी ४७५.०९० मीटर तर एकूण पाणी साठा ९०८.६० दलघमी आहे. उपयुक्त पाणी साठा वजा ८९४.२१ दलघमी तर टक्केवारी वजा ५८.९४ टक्के, एकूण टीएमसी ३२.०८ तर उपयुक्त टीएमसी वजा ३१.५८ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनी धरणाची टक्केवारी वजा १९.७७ इतकी होती.