सुताच्या दरात वाढ; टॉवेल-चादरींच्या किंमतीत प्रति किलो दहा रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 02:22 PM2020-12-04T14:22:15+5:302020-12-04T14:22:54+5:30
यंत्रमागधारकांचा निर्णय : सुताचे दर वधारल्याने किमती वाढविल्या
सोलापूर : टॉवेल आणि चादरीला लागणारा मुख्य कच्चा माल अर्थात सुताच्या दरात सतत वाढ होत असल्याने सोलापुरातील यंत्रमागधारकांनी टॉवेल आणि चादरींच्या किमतीत प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंत्रमागधारकांच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय झाला.
सध्या चादरींच्या किमती प्रतिकिलो १६० ते ३५० रुपयांपर्यंत आहेत. तसेच टॉवेलचे दर प्रतिकिलो २५० ते ४०० रुपये इतके आहे. गुणवत्तेनुसार टॉवेल आणि चादरींचे दर ठरतात. आता या दरात दहा रुपयांची वाढ निश्चित झाली आहे.
सर्वप्रकारच्या सुताच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. सूत खरेदी केल्याशिवाय यंत्रमाग कारखाने सुरू करता येत नाहीत. या वाढीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. शिवाय गुंतवणुकीतही वाढ होत आहे. त्यामुळे दरवाढही अनिवार्य असल्याची माहिती येथील उद्योजकांनी दिली आहे.
उद्योगासमोर अनेक संकटे
कोरोना महामारीचा फटका येथील यंत्रमागधारकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या संकटातून उद्योजक आता सावरताहेत. लॉकडाऊनच्या काळात उद्योजकांना भरमसाट वीज बिले आली आहेत. विजेच्या दरातदेखील वाढ झाली आहे. विकलेल्या मालाचे पैसे अद्याप येणे बाकी आहे. बाजारात मोठी थकबाकी आहे. बिले येईनात. अशात सुताच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे टॉवेल आणि चादरींच्या किमतीत वाढ करणे अनिवार्य झाले आहे.
- पेंटप्पा गड्डम
अध्यक्ष, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर
.......