चुकीचे मीटर रीडिंग, बिले मिळत नसल्याच्या सोलापुरात वाढल्या तक्रारी
By Appasaheb.patil | Published: July 23, 2021 03:23 PM2021-07-23T15:23:41+5:302021-07-23T15:23:56+5:30
महावितरणचा कारभार - सरासरी वीजबिलांमुळे वीज ग्राहकांना बसतोय फटका
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - चुकीचे मीटर रीडिंग, वीज बिले वेळेवर मिळत नसल्याने सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील वीज ग्राहकांना १० रुपयांपासून ते हजार रूपयांपर्यंतचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरणच्या या चुकीच्या कारभारामुळे वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. चुकीचे बिले दुरुस्तीसाठी गेल्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारीही ग्राहकांनी लोकमतच्या प्रतिनिधीसमोर सांगितल्या.
दर महिन्याच्या एक ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज जोडणी मीटरचे फोटो रीडिंग घेतले जाते. ग्राहकांच्या वीज बिलावर ही तारीख व मीटर क्रमांक नमूद आहे. या तारखेच्या एक दिवस आधी 'महावितरण'कडून ग्राहकांना 'एसएमएस' पाठवून स्वतःहून रीडिंग पाठविण्याची विनंती केली जाते. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल ॲप, 'महावितरण'चे संकेतस्थळ किंवा 'एसएमएस'द्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याची सवय अद्याप ग्राहकांना लागली नाही, त्यामुळे एजन्सीचे कर्मचारी जेव्हा मीटर रीडिंग घेऊन जातात; तेव्हाच बिले मिळतात, तीही उशिरा मिळत असल्याने वीज ग्राहक महावितरणविरोधात नाराजी व्यक्त करतात याचा फटका वीज बिलांच्या थकबाकीवर पडतो.
मीटर रीडिंग व बिले वाटपाबाबत महावितरण व एजन्सीकडून तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या तारखेला संबंधित कर्मचारी मीटर रीडिंग घेतो व वेळेवर वीज बिले पाठविली जातात. वीज ग्राहकांचे नुकसान महावितरणकडून होणार याची काळजी घेऊ.
- चंद्रकांत दिघे, शहर अभियंता, महावितरण, सोलापूर
कर्मचारी करतात ग्राहकांचा अपमान
चुकीचे बिल आल्यानंतर दुरुस्तीसाठी व ज्यादा बिले आल्याबाबतचा विचारणा करण्यासाठी वीज ग्राहक जेव्हा महावितरणच्या कार्यालयात जातो तेव्हा महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना दाद देत नाहीत. शिवाय कर्मचारीही ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देतात, असा आरोप वीज ग्राहकांनी लोकमतच्या प्रतिनिधीसमोर सांगितले.