महाराष्ट्रातील दुधाला इतर राज्यातून वाढली मागणी; काय आहे नेमकं कारण जाणून घ्या

By Appasaheb.patil | Published: October 6, 2022 05:36 PM2022-10-06T17:36:02+5:302022-10-06T17:36:05+5:30

लम्पी आजाराचा परिणाम : दूध खरेदी दरही वाढला

Increased demand for milk from Maharashtra from other states; Find out the real reason | महाराष्ट्रातील दुधाला इतर राज्यातून वाढली मागणी; काय आहे नेमकं कारण जाणून घ्या

महाराष्ट्रातील दुधाला इतर राज्यातून वाढली मागणी; काय आहे नेमकं कारण जाणून घ्या

Next

सोलापूर : लम्पी आजार थोपविण्यात महाराष्ट्राला आलेल्या यशामुळे महाराष्ट्रातील दुधाला इतर राज्यातून मागणी वाढल्याने खरेदी दरातही वाढ झाली आहे. पावडर व बटरच्या दरातही झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना दुधातून चांगला पैसा मिळू लागला आहे.मागील महिन्यात देशभरात जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले होते. वेळीच लक्ष न दिलेल्या राज्यात जनावरांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले तर आजारामुळे दुधावर ही मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात मात्र, सरकारने वेळीच लसीकरणावर जोर दिल्याने जनावरांचे फार असे नुकसान झाले नाही. शिवाय दूध संकलनावर ही परिणाम झाला नसल्याचे सोनाई दुधाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रातील दुधाला इतर राज्यातून ही मागणी आहे मात्र मागणीच्या पटीत दुधाची उपलब्धता होत नसल्याचे रियल डेअरीचे अध्यक्ष मनोज तुपे यांनी सांगितले. यामुळेच गाय दूध खरेदी दरात १ ऑक्टोबरपासून १ रुपयाने वाढ झाली आहे. गाई सोबत म्हैस दूध खरेदी दरही वाढला असल्याचे ऊर्जा डेअरीच्या प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. लम्पी आजाराने इतर राज्यात जनावरे दगावल्याने दूध संकलनात ही घट झाली तर महाराष्ट्रात संकलनावर कसलाही परिणाम झाला नाही. सणाचे दिवस असल्याने राज्यातही दुधाची मागणी वाढली आहे शिवाय इतर राज्यातूनही दुधाला मागणी वाढली असल्याचे सांगण्यात आले.

पावडर, बटरचे दर वाढले

मागील वर्षी २०० रुपये किलो असलेल्या पावडरचा दर ३१० रुपये तर बटरचा दर ३२५ रुपयांवरुन ४२० रुपयांवर गेला आहे. दुधाच्या टंचाईमुळे पावडर, बटरच्या दरात वाढ झाल्याने दूध खरेदी दरही वाढला आहे. एक ऑक्टोबरपासून ३.५ , ८.५ गाय दुधाला ३६ रुपये व त्यापेक्षा अधिक फॅट असलेल्या दुधाला अधिक दर दिला जात आहे.

अधिक पारदर्शकता आली..

मागील काही वर्षांत दूध व्यवसायात तरुण मुले व महिला उतरल्या आहेत. महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील दूध संस्थांही खेड्यापाड्यात तरुणांना संकलन केंद्र देत आहेत. अद्यावत मशीनवर फॅटवरच दूध दर ठरत असल्याने दूध व्यवसायात पारदर्शकता आली आहे. यामुळे आता एखाद्या डेअरीने दर वाढवला की इतर डेअऱ्यांना ही खरेदी दर वाढवावा लागतो.

सोलापूर जिल्ह्यातील दूध व्यवसाय खासगी दूध संघाच्या हातात गेला आहे. नियमाच्या कचाट्यात व आर्थिक अडचणीमुळे आमची गोची होत असली तरी आम्हीही १ ऑक्टोबरपासून गाय दुधाला ३६ रुपये दर देत आहोत. शेतकऱ्यांना पैसे मिळत असताना आम्ही दराबाबत मागे-पुढे पाहणार नाही.

- रणजितसिंह शिंदे, चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ

Web Title: Increased demand for milk from Maharashtra from other states; Find out the real reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.