विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या वाढीव तुकड्या शासनाकडून नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:40 PM2019-09-05T13:40:34+5:302019-09-05T13:43:58+5:30
सोलापूर जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांचा समावेश; राज्यात एकूण २३ तुकड्यांना परवानगी नाकारली
सोलापूर : शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने विशिष्ट विद्याशाखांच्या तुकड्यांना जलदगतीने मान्यता देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शिफारसी मागविल्या होत्या. महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता न केल्यामुळे विद्यापीठाने शिफारस केलेल्या पाच महाविद्यालयांच्या आठ तुकड्यांना शासनाने नामंजूर केले आहे. त्यामुळे आता वाढीव प्रवेशासाठी काय करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (बारावी) उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये जलदगतीने नवीन तुक ड्यांना मान्यता देण्याची तरदूत आहे. यानुसार सोलापूर विद्यापीठाने राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडे वाढीव तुकड्यांसाठी शिफारस केली होती.
निकषांची पूर्तता न केल्याने मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठ औरंगाबाद, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यासह सोलापूर विद्यापीठ अशा राज्यातील एकूण २३ तुकड्यांना शासनाने परवानगी नाकारली आहे. यात सोलापूर विद्यापीठाच्या पाच महाविद्यालयातील आठ तुकड्यांचा समावेश आहे.
वाढीव तुकड्या का नाकारल्या ?
शासनाच्या नियमानुसार महाविद्यालयांनी निकष व कागदपत्रांची पूर्तता न केल्याने वाढीव तुकड्या नामंजूर करण्यात आल्या आहेत. इमारतीची प्रमाणित कागदपत्रे सादर न करणे, इमारतीचा प्रमाणित नकाशा तसेच छायाचित्र न जोडणे, संस्थेचे हमीपत्र, जमिनीची कागदपत्रे जोडली मात्र इमारतीची कागदपत्रे जोडली नाहीत तसेच आवश्यक इतर कागदपत्रे शासनाकडे जमा न केल्याने वाढीव तुकड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
या महाविद्यालयांच्या तुकड्या नामंजूर
- संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संचलित, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर (एम. कॉम. आणि बी. एस्सी.), अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी सी. बी. खेडगी कॉलेज अक्कलकोट (बी. एस्सी. आणि बी. कॉम.), शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी (बी. कॉम.), श्रीराम शिक्षण संस्था, श्रीराम इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी पानीव (बी. एस्सी., ई.सी.एस. आणि बी.सी.ए.).
शासनाने वाढीव तुकड्या नामंजूर केल्याचे केणतेही पत्र अद्याप आम्हाला मिळालेले नाही. जर असे झाल्यास लवकरात लवकर शासनाने सांगितलेल्या अटींची पूर्तता करू. वाढीव तुकड्यांना शासनाकडून मान्यता मिळविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
- डॉ. एस. आय. पाटील,
प्र. कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.