उजनी धरणाची उंची वाढवणं तितकंसं सोपं नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:46+5:302021-05-09T04:22:46+5:30

इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी जलाशयातून पाण्याचा उपसा करून पाच टीएमसी पाणी नेण्याची योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेला ...

Increasing the height of Ujani dam is not so easy | उजनी धरणाची उंची वाढवणं तितकंसं सोपं नाही

उजनी धरणाची उंची वाढवणं तितकंसं सोपं नाही

Next

इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी जलाशयातून पाण्याचा उपसा करून पाच टीएमसी पाणी नेण्याची योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेला जिल्ह्यातून तीव्र विरोध केला जात आहे. कोणत्याही स्थितीत पाणी उचलता येणार नाही, अशी भूमिका सर्वस्तरातून घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील यांनी उजनी धरणाची उंची दोन फुटाने वाढवल्यास धरणात १२ टीएमसी पाणीसाठा होऊ शकेल. त्यातून पाच टीएमसी इंदापूरला नेण्यास हरकत नाही. या कामासाठी फारसा खर्च येणार नाही भूसंपादनाची देखील गरज नाही असे मत व्यक्त केले आहे.

माजी आमदार राजन पाटील यांच्या मताशी असहमती दर्शवत धरणाची उंची वाढवणे आता तितकेसे सोपे राहिले नाही. त्यात अनेक अडचणी आहेत. उंची वाढवणे व्यावहारिक आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. नाव न छापण्याच्या अटीवर या अधिकाऱ्यांनी त्यातील अडथळे आणि तांत्रिक मुद्दे अधोरेखित केले.

------

यापूर्वीच उंची ०.६ मीटरने वाढवली

उजनी धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा ११७ टीएमसी होता. पूरनियंत्रणाच्या नावाखाली १९९३ साली दरवाज्यांवर लोखंडी फ्लॅप टाकून ०.६ मीटरने उंची वाढवण्यात आली आहे. ६ टीएमसी पाणी साठा वाढला. उजनीचा पाणीसाठा ११७ वरून १२३ टीएमसी झाला आहे;मात्र कागदोपत्री त्याची नोंद नाही.आजही कागदोपत्री ११७ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद केली जाते.वाढीव पाणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सोडले जाते.

-----

तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे

उजनी धरणाची उंची वाढवण्याची कल्पना तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरते असे मत तज्ज्ञांनी मांडले. धरण काळ्या मातीत बांधण्यात आले आहे. दोन्ही बाजूला मातीचे भराव आहेत. त्याची क्षमता तपासावी लागेल. दरवाजांची मजबुती, धरणाची साठवण क्षमता तपासावी लागेल. १९६७ साली बांधकाम सुरू झाले त्यावेळी २५० ग्रेडचे लोखंडी बार (सळई) वापरण्यात आले होते. आता ५०० ग्रेडचे बार उपलब्ध आहेत. कमी जाडीच्या बारमुळे त्याची स्थैर्यता तपासण्याची गरज आहे. १९८० साली धरणात पाणीसाठा करण्यात आला. तेव्हापासून धरणाच्या बांधाचा वापर सुरू आहे. आधीच चुन्यात केलेले बांधकाम किती टिकाऊ असेल हे सांगता येत नाही. उंची वाढली तर तळातील बांधकामावर दाब येतो उंची वाढवण्याचे मार्जिन संपले आहे. इतक्या वर्षांनंतर बांधकामाची कार्यक्षमता कमी होत असते. हा विचारही व्हायला हवा असे मत त्यांनी मांडले.

------

भूसंपादनाचा मोठा अडथळा

धरणाची जसजशी उंची वाढेल तसे त्यातील पाणी पसरत जाते. दोन फुटाने धरणाची उंची वाढवल्यास पाणी पातळी वाढणार, त्यासाठी किमान ४३ हजार हेक्टरपेक्षा जास्त भूसंपादन करावे लागेल. सध्या उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात ऊस, केळी अशी पैशांची पिके घेतली जातात. तेथील शेतकरी सहजासहजी भूसंपादनास संमती देतील अशी स्थिती नाही. पूर्वी गरजेपेक्षा अधिक भूसंपादन केले असले तरी ०.६ मीटर उंची वाढल्याने ही जमीन व्यापली आहे. उर्वरित जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. अशा स्थितीत भूसंपादन हा मोठा अडथळा ठरू शकतो.

---------

पाणी कोठून उपलब्ध करणार ?

धरणाची उंची वाढवली तरी त्यासाठी पाणी कोठून उपलब्ध करणार हा प्रश्न आहे. उजनी धरणावर पुणे जिल्ह्यात नवीन १५ धरणे बांधण्यात आली आहेत. उजनीत पाणी येणे कमी झाले आहे. आता तर दर चार वर्षांत एकदाच उजनी पूर्ण क्षमतेने भरते. ही वस्तुस्थिती असून वाढीव पाणी उपलब्ध झाले तरच धरणाच्या उंचीची कल्पना व्यवहार्य ठरू शकते,असे मत भीमा कालवा मंडळाचे निवृत्त अधीक्षक अभियंता ब. दा. तोंडे यांनी व्यक्त केले.

-----

Web Title: Increasing the height of Ujani dam is not so easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.