सोलापुरातील शासकीय रुग्णालयावर वाढत्या रुग्णांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:18 PM2019-06-01T13:18:19+5:302019-06-01T13:19:18+5:30
रोज होतात ४३ शस्त्रक्रिया; बाह्यरूग्ण विभागात रोज १४०० रुग्णांची तपासणी
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्टर तसेच कर्मचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांचा भार वाढल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होतात. यामुळे डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांत वादही होतो.
शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय हे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय रुग्णालयाचा भाग आहे. हे रुग्णालय फक्त स्पेशालिस्ट सेवा देण्यासाठी असताना इतर सेवाही या रुग्णालयाला द्याव्या लागत आहेत. फक्त शहरच नव्हे तर जिल्हा तसेच परराज्यातील रुग्णदेखील येथे उपचारासाठी येत असतात. अशातच जिल्हा रुग्णालय सुरू न झाल्याने तिथे जाणारे रुग्ण हे थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. प्राथमिक उपचार केंद्र व महापालिकांच्या रुग्णालयाची अवस्था व्यवस्थित नसल्याने याचा भार शासकीय रुग्णालयावरच पडत आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. यासोबतच रुग्णांवर उपचारदेखील करावे लागतात. अशातच रुग्णांचा भार वाढल्यास त्याचा परिणाम हा त्यांना देण्यात येणाºया सेवेवर होतो. प्राथमिक उपचार केंद्र व महापालिकांच्या रुग्णालयातील रुग्णांना तेथील डॉक्टर हे स्वत: प्रचार न करता शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात, असा आरोप शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी केला.
असा आहे रुग्णालयावरील भार..
- शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे १४०० रुग्णांवर उपचार करण्यात येतात. तर सरासरी रोज २० मोठ्या शस्त्रक्रिया तर २३ छोट्या शस्त्रक्रिया करण्यात येतात. तर दिवसाला २८ महिलांची बाळंतपण करतात तर अतिदक्षता विभागात ५८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर उपचारादरम्यान मृत होणाºया रुग्णांची संख्या ही रोज सरासरी सहा आहे. सध्या रुग्णालयात एकूण ७७३ बेड असून ८०० रुग्ण अॅडमिट आहेत. तर दिवसाला १०० रुग्ण या रुग्णालयात अॅडमिट होतात.
प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिकेची रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालयांनी आपली सेवा व्यवस्थित दिल्यास शासकीय रुग्णालयावर ताण पडणार नाही. या रुग्णालयाचा वापर फक्त स्पेशालिस्ट उपचार देण्यासाठी झाल्यास महाविद्यालय व येथील विद्यार्थ्यांचा खरा उद्देश सफल होऊ शकतो.
- डॉ. सुभलक्ष्मी जयसवाल,
अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय रुग्णालय.