१४ डिसेंबरपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:22 AM2020-12-06T04:22:50+5:302020-12-06T04:22:50+5:30
वडाळा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत या मागणीसाठी १४ डिसेंबर २०२० पासून बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन ...
वडाळा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत या मागणीसाठी १४ डिसेंबर २०२० पासून बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अरुण सुर्वे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीमध्ये दोन ते अडीच हजार कर्मचारी विविध पदावर काम करीत आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संकट थोपवण्यास हातभार लावला होता. हे काम करताना जेऊर व होनमुर्गी येथील कर्मचाऱ्यांना स्वत:ला जीव गमवावा लागला. कोरोनाने मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा काढण्यात आला. दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मिळणाऱ्या ५० लाखांच्या विम्याचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी गुरुबा भोसले, मसुदेव रणदिवे, बंडू कारंडे, दत्तात्रय नाकोरे, महादेव पारसे, सिद्धाराम कोळी, भगवान कांबळे, बाबा कोळी उपस्थित होते.