परीक्षांच्या तोंडावर बेमुदत संप, विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन
By Appasaheb.patil | Published: February 20, 2023 03:24 PM2023-02-20T15:24:05+5:302023-02-20T15:24:41+5:30
शेकडो कर्मचाऱ्यांचा सहभाग; वर्गखोल्या उघडल्या नसल्याने विद्यार्थ्यांचा पायरीवरच वर्ग
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वालचंद शिक्षण समूहातील बेमुदत संपात सहभागी नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरू केले. दयानंद महाविद्यालयातील वर्ग खोल्या उघडले नसल्यामुळे विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्याचा प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा वर्ग पायरीवर घेतला.
विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप सोमवारपासून (दि.२०) सुरु झाला. विद्यापीठासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील ३७ महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी आहेत. बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी वालचंद शिक्षण समूहातील महाविद्यालयाच्या गेटसमोर शहरातील अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात निदर्शने व घोषणा देऊन आंदोलन सुरू केले. आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे सेनेचे विष्णू कारमपुरी, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, कस्तुरबाई कॉलेज एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. आश्विन बोंदार्डे यांनी भेट देऊन या संपास शुभेच्छा देऊन पाठिंबा व्यक्त केला. यावेळीदोन्ही प्राचार्याचेंही बुके व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील संगमेश्वर, दयानंद, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला, युनियन महिला, वसुंधरा, सोलापूर सोशल, ए. आर. बुर्ला व छत्रपती शिवाजी रात्र या शहरातील अनुदानित महाविद्यालयातील ३०० कर्मचारी वालचंद शिक्षण समूहातील महाविद्यालयाच्या गेट समोर उपस्थित होते. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विभागीय सचिव अजितकुमार संगवे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, खजिनदार राहुल कराडे, सहसचिव इमाम लालका, दिपाली करजगीकर, आरती देशक, संजीवनी सादुल, नियाझ शेख, कय्युम पठाण, अल्ताफ होटगी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व घोषणा देऊन आंदोलन केले.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
मंगळवारी ( दि. २१) शहरातील सर्व महाविद्यालयातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळात निदर्शने आंदोलन करतील. ग्रामीण भागातील कर्मचारी तहसील कार्यालयासमोर तर विद्यापीठ कर्मचारी विद्यापीठाच्या गेटसमोर निदर्शने आंदोलन करतील, असे सोलापूर विद्यापीठ व महाविद्यालय संयुक्त सेवक कृती समितीने कळविले आहे.