भारत हिंदू राष्ट्र होणे आवश्यक
By admin | Published: January 6, 2015 10:35 PM2015-01-06T22:35:20+5:302015-01-06T23:59:14+5:30
हेमंत मणेरीकर : मालवणात हिंदू जनजागृती समितीची सभा
मालवण : हिंदू धर्माला बळकटी आणण्याकरीता व भारत देशाच्या प्रगतीकरीता हिंदू बांधवांनी संघटीत होणे गरजेचे आहे. भारत देश आज अनेक समस्या व विकृतींनी जखडला गेला आहे. यातून देशाची मुक्तता करावयाची असल्यास भारत हे हिंदू राष्ट्र होणे आवश्यक आहे, असे विचार हिंदू धर्म प्रचारक हेमंत मणेरीकर यांनी मालवण येथे पार पडलेल्या हिंदू धर्म जागृती सभेत व्यक्त केले.हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारी हिंदू धर्म जागृती सभा पार पडली. यावेळी स्वाती खाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सदस्य तसेच मालवण तालुक्यातील बहुसंख्य हिंदूधर्मीय नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना हेमंत मणेरीकर म्हणाले, हिंदू धर्मातील लोक संघटीत नसल्याने त्याचा फायदा दुष्ट प्रवृत्तीकडून घेतला जात आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटीत होऊन एकजुटीने अशा दुष्ट प्रवृत्तींना हद्दपार केले पाहिजे. त्यासाठीच हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा सभा आयोजित केल्या जात आहे. आज देशात हिंदुत्ववादी पक्षांचे सरकार आहे. तरीही अशा सभा घ्याव्या लागत आहेत. आज हिंदू धर्मावर गोहत्या, धर्मांतरण, दहशतवाद लव जिहाद अशाप्रकारे विविध मार्गांनी अत्याचार होत आहेत. यामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर पाकिस्तान व बांग्लादेश या देशांमध्ये राहणाऱ्या हिंदुंचेही जगणे मुश्किल झाले आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव यांच्या विळख्यात हिंदू धर्म सापडला आहे. यामुळे भारतात अत्याचार, दहशतवाद, भ्रष्टाचार, घोटाळे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे भारताला सुस्थितीत आणण्यासाठी हिंदू राष्ट्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदू धर्मवीर निर्माण झाले पाहिजेत असेही मणेरीकर म्हणाले.
यावेळी बोलताना स्वाती खाडे म्हणाल्या, आज हिंदूधर्मीय पाश्चात्य प्रवृत्तींच्या आहारी जात आहेत. त्यामुळे हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूधर्मीय अशा प्रवृत्तींकडे ओढले जात आहेत. हिंदूच्या परंपरा व सणांवर काही धर्मद्रोही आरोप करून पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूधर्मियांना फसवत आहेत. हिंदू देवतांच्या मूर्ती, मंदिरे यांची धर्मद्रोही लोकांकडून विटंबना केली जात आहे. मात्र, याबाबत कोणीही पुढे येवून आवाज उठवित नाही. त्यामुळे हिंदू धर्म व हिंदू संस्कृती निरंतर टिकविण्यासाठी भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून अस्तित्वात येणे गरजेचे आहे. यासाठी हिंदूंनी संघटीत व्हावे तसेच हिंदू जनजागृती समिती हिंदू राष्ट्र निर्माण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असेही स्वाती खाडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)