धान्य व फूड्स मशीनचे देशातील सर्वात मोठे प्रदर्शन सोलापुरात
By शीतलकुमार कांबळे | Published: December 1, 2023 03:30 PM2023-12-01T15:30:52+5:302023-12-01T15:31:20+5:30
रेल्वे स्टेशन जवळील विष्णू मिल कंपाउंडच्या ग्राउंडवर हे प्रदर्शन होत असून १०० पेक्षा अधिक कंपन्या भाग घेणार आहेत.
सोलापूर : धान्य व फुड्स मशीनचे भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन मिलेट टेक एक्सपो व ग्रेन इंडियाचे तेरावे प्रदर्शन सहा ते आठ डिसेंबर रोजी विष्णू मिल कंपाउंड ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ या वेळेत होणार असल्याचे सोलापूर डाळ मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भुतडा आणि सचिव लक्ष्मीकांत तापडिया यांनी सांगितले.
रेल्वे स्टेशन जवळील विष्णू मिल कंपाउंडच्या ग्राउंडवर हे प्रदर्शन होत असून १०० पेक्षा अधिक कंपन्या भाग घेणार आहेत. डाळी, तांदूळ, गहू, मिलेट्स, मसाले, मैदा, बेसन, गहू, पोहे, शेंगदाणे, मका, काजू, ऊस अशा विविध धान्यांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी मशिनरी या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. सरकी, सोयाबीन अशा विविध बियांपासून बनणारे तेल ज्या मशीन मधून तयार होते ती मशिनरी देखील या प्रदर्शनात पाहायला मिळेल.
केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर ( भरडधान्य) म्हणून जाहीर केले आहे. विविध मशिनरींचे थेट प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. सोलापूर तसेच लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा, विजापूर या सोलापूर जिल्ह्याच्या परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील डाळ मिल ओनर्सना त्यांच्या कारखान्यांमध्ये अत्याधुनिकीकरण करण्यासाठी या यंत्रसामुग्रीचा उपयोग होणार आहे.
या कार्यक्रमच्या आयोजनामध्ये राजेंद्र तापडिया मार्गदर्शन करत आहेत, असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भुतडा व सचिव लक्ष्मीकांत तापडिया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस नितीन घटोळे, राहुल सोमाणी व अक्षय जव्हेरी उपस्थित होते.