तरुणाईचा ग्रामपंचायतींवर प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:47+5:302020-12-29T04:21:47+5:30
गावागावातील राजकीय स्थिती सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. काही गावांमधील राजकीय परिस्थिती चिघळत असून, निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. ...
गावागावातील राजकीय स्थिती सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. काही गावांमधील राजकीय परिस्थिती चिघळत असून, निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मात्र काही गावांमधील उच्चशिक्षित तरुणाई गाव बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असताना दिसत आहे. यामध्ये विकासाच्या अनेक मुद्द्यांबरोबर गावातील एकोपा टिकवण्यासाठी तरुणाई बैठका घेताना दिसत आहे, तर दुसरीकडे भ्रष्टाचार व विकास न झाल्याच्या मुद्द्यावर ज्येष्ठांविरुद्ध दंड थोपटत निवडणुकीचा यल्गार पुकारणारी तरुण फळी मैदानात उतरली आहे.
तरुणाईचा वरचश्मा
अलीकडील काळात गावागावातील उच्चशिक्षित तरुणांकडे वरिष्ठ पातळीच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास आहे. यामुळे गावगाड्यातील राजकीय वातावरणात होत असलेल्या नुकसानीचा आलेख गावासमोर मांडत ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी एकवटली आहे. तर काही गावांमधील तरुणाई मात्र भ्रष्टाचार, विकास अशा काही मुद्द्यांसाठी ज्येष्ठांविरुद्ध नाराजी व्यक्त करून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत. एकूणच ग्रामपंचायत बिनविरोध अथवा रंगतदार असा तरुणाईच्या जादूई करिष्मा पाहायला मिळणार आहे.