लातूर येथे ९ ते ११ फेबु्रवारी दरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन, अभिमन्यू टकल यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:07 PM2018-01-12T12:07:07+5:302018-01-12T12:11:36+5:30
दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापुरात यशस्वीरित्या पार पडले. सोलापूरच्या धनगर साहित्य संमेलनाच्या यशस्वितेचे कौतुक महाराष्ट्र शासनातर्फे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांनी केले होते. संमेलनामध्ये केलेल्या पाच ठरावांपैकी तीन ठराव निकालात काढले आहेत. त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. धनगर समाजाच्या शेळी, मेंढी विकासासाठी १००० कोटींची मागणी केली होती, पैकी २५० कोटी यशवंतराव होळकर महामेष योजना पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर व कॅबिनेट सचिव आबासाहेब जºहाड यांच्यामार्फत मंजूर केले आहे. ठराव क्र. १ धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू झाले पाहिजे होते; मात्र याबाबत आशा आहे. शासन वेळ घेईल पण मागणी मान्य करेल. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, आद्य क्रांतिकारक छत्रपती यशवंतराव होळकर, आद्य क्रांतिकारक भीमाबाई होळकर यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो, असेही यावेळी डॉ. अभिमन्यू टकले यांनी सांगितले.
दि. ९ फेब्रुवारी रोजी धनगर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन करणारी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी भंडारा उधळून धनगर समाजाच्या ऐतिहासिक महापुरुषाचे हार घालून ज्येष्ठ साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले जाईल. नंतर दिवसभर तीन परिसंवाद घेतले जातील. दि. ११ फेब्रुवारी रोजी विविध विषयांवर परिसंवाद होतील आणि सायंकाळी समारोप होईल, असेही डॉ. अभिमन्यू टकले यांनी सांगितले. यावेळी संभाजीराव सूळ, अमोल पांढरे, अर्जुन सलगर, सचिन देशमुख उपस्थित होते.
-------------------------
संमेलनाच्या अध्यक्षपदी संगीता धायगुडे
- संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संगीता उत्तम धायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता धायगुडे या सध्या मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत आंधळी, ता. माण, जि. सातारा येथे झाले आहे. समाजशास्त्र विषयात एसएनडीटी महाविद्यालयातून पदवी व एम.ए. मराठी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे ‘हुमाना’ हे आत्मकथन सध्या जगभरात गाजत आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेकडून लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, डॉ. द. ता. भोसले पुरस्कार मिळाला आहे. ‘प्रिय आयुष्यास सप्रेम नमस्कार’ हा कवितासंग्रह प्रचंड गाजला आहे. असे अनेक उल्लेखनीय कार्य संगीता धायगुडे यांचे आहे.