जिल्हा बँक उतरविणार शेतकऱ्यांचा विमा, राजन पाटील यांची माहिती
By Admin | Published: April 18, 2017 06:27 PM2017-04-18T18:27:41+5:302017-04-18T18:27:41+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८: आज स्पर्धेच्या युगात कोणाचेही जीवन सुरक्षित नाही, कुटुंबाचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी विमा गरजेचा असून, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये विम्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी केले.
एक्साईड इन्शुरन्स कंपनी व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने बँक इन्स्पेक्टर व बँकेच्या कर्मचाऱ्यांना विमा उतरविण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद््घाटन बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एक्साईड इन्शुरन्स कंपनीने राज्यातील १३ जिल्हा बँकांशी करार केला असून, यामध्ये सोलापूर जिल्हा बँकेचा समावेश आहे. शेतकऱ्यांना विमा सेवा देण्यासाठी जिल्हा बँकेने एक्साईड इन्शुरन्स विमा कंपनीशी करार केला असून, बँक आता जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा विमा उतरविणार आहे. आज धावपळीच्या युगात प्रत्येकाचे जीवन धोक्यात आहे. आपण व्यवस्थित वाहन चालवित असलो तरी समोरचा येणारा सरळ जाईलच असे सांगता येत नाही. अशा परिस्थितीतही आपल्याला वेळेवर कामाच्या ठिकाणी जावे लागते. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकाने विमा उतरविला पाहिजे, असे बँकेचे अध्यक्ष पाटील म्हणाले. विमा कंपनीचे हेमंत कोठारी यांनी आमची विमा कंपनी २००१ पासून या क्षेत्रात काम करत असून, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यापासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेपर्यंत जबाबदारीने काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, सहायक व्यवस्थापक सुभाष भडगावकर, विमा कंपनीचे अमोघ देशपांडे, विकास जाधव, संदीप खोत आदी उपस्थित होते.
-----------------
खातेदारांसाठीही सुविधा
खासगी बँकांच्या स्पर्धेत सोलापूर जिल्हा बँक मागे राहणार नाही, अद्ययावत सुविधा जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये देण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष पाटील म्हणाले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खातेदारांना चांगली सुविधा द्यावी, ठेंवी वाढविण्यावर भर द्यावाच शिवाय लोकांना आपली बँक आहे असे वाटेल असे काम करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.