सोलापूर जिल्ह्यात ५०० कृषी पर्यटन कें द्रे साकारणार- सुभाष देशमुख यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:00 PM2018-10-09T16:00:32+5:302018-10-09T16:03:29+5:30
सुभाष देशमुख: सोलापूर विद्यापीठात कृषी पर्यटन केंद्राचा आरंभ
सोलापूर : ग्रामीण संस्कृती नावारुपास आणण्यासाठी जिल्ह्यात ५०० कृषी पर्यटन केंद्रे साकारण्याचा आपला मानस आहे. यातील पहिले पर्यटन केंद्र सोलापुरात सुरू होत आहे. या माध्यमातून सोलापूरच्या पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. रोजगारवाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी सामूहिक योगदानाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूर विद्यापीठाच्या वतीने नव्याने साकारणाºया कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे विशेष कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही.बी. पाटील, क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी या केंद्राच्या समन्वयक डॉ. माया पाटील यांनी केंद्राविषयी माहिती दिली.
सहकारमंत्र्यांनी आपल्या भाषणातून पुणे-मुंबई प्रमाणे सोलापूर विद्यापीठाचाही गुणवत्तेचा दर्जा वाढणे आवश्यक असून त्यासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या पदभार घेतल्यापासून प्रयत्न होत आहेत. सोलापूर विद्यापीठात जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील विद्यार्थी येणे अपेक्षित असून त्यासाठी सोलापूरचा विकास होणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सोलापूर जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. तरीही या जिल्ह्यात ४० साखर कारखाने आहेत.
उजनी धरणामुळे हे शक्य झाले. शहरी व ग्रामीण संस्कृती फार वेगळी आहे. ग्रामीण संस्कृती अनुभवण्यासाठी जिल्ह्यात सुमारे पाचशे कृषी पर्यटन केंदे्र साकारण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
कृषी क्षेत्रात सोलापूर, महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्र पुढे येणे आवश्यक आहे. आज शेतकºयांसमोर पाण्यासह विविध समस्या आहेत, म्हणूनच कृषी पर्यटनाच्या माध्यमातून एक वेगळा उद्योग सुरू करून विकास साधण्याची संधी आज शेतकºयांसमोर आहे. त्यामुळेच सोलापूर विद्यापीठातर्फे कृषी पर्यटनाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच कृषी पर्यटन केंद्राचाही शुभारंभ करण्यात आल्याचे कुलगुरु प्रा. डॉ.फडणवीस म्हणाल्या. विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातूनही कृषी पर्यटन केंद्राच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.
यावेळी कृषी पर्यटन केंद्रासाठी सहकार्य केलेल्या रोटरी क्लब, लायन्स क्लब, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेटचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार केंद्राचे सहसमन्वयक डॉ. विनायक धुळप यांनी मानले.
मेक इन सोलापूरसाठी योगदान द्या
- कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून सोलापूरच्या पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. सोलापूरच्या प्रचार व प्रसारासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा वापर करावा. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र व मेक इन सोलापूर ही भावना मनात ठेवा. या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांचे योगदान द्या, असे आवाहनही सहकारमंत्र्यांनी यावेळी केले.