मेंदूज्वराबाबत शाळांनीच दिली माहिती; सोलापुरातील प्रसिद्धी, प्रचाराचा निधी जिरला कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 04:56 PM2022-01-21T16:56:04+5:302022-01-21T16:56:09+5:30
शासनाकडून विचारणा : आरोग्य विभागाचा ७५ लाखांचा खर्च झाला कशावर
सोलापूर : जिल्ह्यातील शाळकरी मुलांना मेंदूज्वराची लस देण्याविषयी पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाला ७५ लाखांचा निधी दिला. पण, प्रत्यक्षात लसीकरण सुरू असताना लसीकरण केंद्र व शहरामध्ये जागृतीसाठी कोणताच उपक्रम न दिसल्याबद्दल शासनाने आरोग्य विभागाला विचारणा केली आहे.
सन २०१८ मध्ये सोलापुरात मेंदूज्वराचा रुग्ण आढळला होता. जिल्ह्यातील शाळकरी मुलांना मेंदूज्वराची बाधा होऊ नये म्हणून शासनाने लसीकरणाचा उपक्रम राबविला. सोलापूर जिल्ह्यातील १ ते १४ वयोगटातील सुमारे दहा लाख ७६ हजार मुलांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे लस उपलब्ध करून देण्यात आली. लस देणे गरजेचे आहे, याचे पालकांना महत्त्व पटविण्यासाठी शासनाने प्रचार व प्रसिद्धीसाठी ७५ लाखांचा निधी उपलब्ध केला. या निधीतून प्रसिद्धीपत्रके, शहर व ग्रामीण भागात फ्लेक्स लावणे, लसीकरण केंद्रावर लसीकरणाबाबत माहिती देणारी भित्तिपत्रके वाटावीत यासाठी हा निधी आहे. यातून फक्त काही प्रमाणात पत्रके छापण्यात आली व ती केंद्र किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या माहितीसाठी उपलब्ध करण्यात आली नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळले आहे.
पत्राद्वारे केली विचारणा
मोहिमेबाबत शाळांनीच पालकांना माहिती दिली आहे. तसेच कोरोना लसीकरणामुळे पालकांमध्येही जागृती झाली आहे. त्यामुळे मुलांचे लसीकरण वेळेत पूर्णत्वाला गेले आहे. पण, शासनाने जिल्हा आरोग्य विभागाला पत्र पाठवून जनजागृतीबाबत काय काय मोहीम घेतली याबाबत विचारणा केली आहे. लसीकरण केंद्र व सार्वजनिक ठिकाणी मेंदूज्वराच्या जनजागृतीचे काहीच उपक्रम दिसून आले नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आलेला निधी कशावर व किती खर्च झाला, याचे गूढ वाढले आहे.
--------
जेई लसीकरणाच्या जनजागृतीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे निधी आला होता. या निधीतून पत्रके छापली व त्यांचे वाटप केले आहे. निधी कमी असल्याने फ्लेक्स किंवा इतर उपक्रम घेता आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
डॉ. बसवराज लोहारे, आरोग्य अधिकारी, मनपा