मराठी ज्ञानभाषेसाठी सोलापूरवासीयांचा पुढाकार, विकीपीडिया मुक्त ज्ञानस्रोतात योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:08 PM2018-02-27T15:08:15+5:302018-02-27T15:08:15+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्था आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेतर्फे सोलापूर विद्यापीठ व दयानंद कॉलेज येथे विकीपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात या निमित्ताने झाली.
यामध्ये एकूण ७४ संपादक सहभागी झाले होते. काही संपादकांनी मराठी भाषा दिनापर्यंत लिखाणात सातत्य ठेवून विकीपीडिया यामुक्त ज्ञानस्रोतात भरीव योगदान केले आहे. या कालावधीत एकूण १७० लेख नव्याने तयार केले गेले तर ४५० लेखांमध्ये संपादने करण्यात आली.
दयानंद महाविद्यालयाच्या बाळकृष्ण माळी, राजशेखर शिंदे, रविकिरण जाधव, अक्षय वाघमोडे, संताजी चावरे, रणजित पाटील, ओंकार आमणगी, गौरीशंकर देशमाने, निखिल सुरवसे, किशोर कारभारी, शालगर डी. जे. यांनी योगदान केले. तसेच डीएचबी सोनी महाविद्यालयाचे प्रा. अरविंद बगले यांनीही भरीव योगदान केले आहे.
यापैकी इंद्रभवन सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील दगडी रांजणे, सोलापूर जिल्ह्यातील शिलालेख, महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालय, पंडित गुरूदत्त विद्यार्थी, महात्मा हंसराज, महाराष्टÑातील वारसा स्थळे, सोलापूर शहर, बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रविषयक विचार, हंबीरराव मोहिते, थोरले शाहू महाराज, मोकासा, हे लेख सर्च टाकून नागरिकांनी जरूर पाहावेत आणि प्रतिक्रिया द्याव्यात, असे आवाहन केले आहे.
पुणे येथे झालेल्या प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत बाळकृष्ण माळी व अरविंद बगले हे सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी विकीपीडिया समन्वयक सुबोध कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अधिकाधिक नागरिकांनी याचे प्रशिक्षण घेऊन ज्ञान निर्मितीत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने करण्यात आले असून, प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागासाठी दयानंद महाविद्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे यांनी केले आहे.
----------------------------
मराठी भाषा संवर्धनासाठी वैविध्यपूर्ण लेखन
- मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सहभागी झालेल्या संपादकांनी सोलापूर शहरातील प्रसिद्ध व्यक्ती, मंदिरे, जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे, संस्कृती, घटना तसेच संगणक तंत्रज्ञान, विज्ञान, साहित्य आदी विषयांवर ज्ञानकोशात लेखन केले आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने विविध संदर्भांचा शोध घेत हे लेखन केले. निरपेक्ष आणि सामूहिक कामाचा आनंद सर्वांनी घेतला.