पाच टीएमसी पाण्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:52+5:302021-05-07T04:22:52+5:30

माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्राद्वारे विरोध दर्शविला ...

Injustice on farmers due to five TMC water | पाच टीएमसी पाण्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

पाच टीएमसी पाण्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

Next

माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्राद्वारे विरोध दर्शविला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयामधून ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून खडकवासला कालव्याच्या किलोमीटर क्रमांक १६१ मध्ये टाकण्याच्या कामास तत्त्वतः मान्यता कळविण्यात आली आहे. वास्तविक, उजनी प्रकल्पाचे जल नियोजन यापूर्वीच झाले आहे. सद्य:परिस्थितीत उजनी जलाशयामध्ये कोणतेही अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही. तसेच भीमा खोरे हे तुटीचे खोरे आहे. वरील संदर्भीय विषयांमधील तत्त्वत: मंजुरी दिलेली योजना ही पुणे शहराच्या सांडपाण्याच्या पुनर्वापरातून तत्त्वत: मान्य केल्याचे दिसते.

सद्य:परिस्थितीत पुणे महानगरपालिकेमार्फत मुंढवा येथे बंधारा बांधून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते. शुद्ध झालेले पाणी खडकवासला कालव्याच्या जुना मुठा कालव्यात सोडण्यात येते. उर्वरित सांडपाणी पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर, दौंड, बारामती या तालुक्यांकरिता वापरण्यात येते. वस्तुत: या सांडपाण्याचा एकही थेंब उजनी जलाशयात येत नाही. त्यामुळे प्रस्तावित योजनेस उजनी धरणातून पाणी देणे व्यवहार्य होणार नाही.

सध्या उजनी जलाशयातील पाण्याचा वापर पूर्ण झाला आहे. तसेच मराठवाड्यालादेखील ७.५ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. परत या योजनेकरिता पाच टीएमसी पाणी मंजूर केले तर विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील योजनांवर फार मोठा परिणाम होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होईल. त्यामुळे सदर योजनेला स्थानिक जनतेचा विरोध होईल.

---

...तर शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

जर पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याव्यतिरिक्त ६.९० टीएमसी पाणी उपलब्ध होणार असेल, तर ते पुणे जवळून उचलून नजीकच्या खडकवासला कालव्यात सोडून प्रस्तावित योजनेला देण्यात यावे. त्यामुळे खर्चही कमी होण्यास मदत होईल. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. याबाबत कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

Web Title: Injustice on farmers due to five TMC water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.