धक्कादायक; मुलावर अक्षता पडण्यापूर्वीच पित्यावर काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:16 PM2020-02-04T12:16:56+5:302020-02-04T12:21:48+5:30
महाळुंगमधील घटना; भगत कुटुंबावर शोककळा
वाघोली : लग्न समारंभाची गडबड... दारी मंडप सजलेला... पै-पाहुण्यांची वर्दळ वाढलेली... महाळुंग (ता. माळशिरस) येथील भगत कुटुंबामध्ये शुभकार्याची लगबग चालू असतानाच नवरदेवाचे वडील भगवान कृष्णाजी भगत (वय ५९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे भगत कुटुंबावर शोककळा पसरली. मुलाच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच काळाने पित्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भगवान भगत यांच्या मुलाचे लग्न ४ फेब्रुवारी रोजी आयोजित केले होते. या कार्यासाठी संपूर्ण कुटुंबाची धावपळ सुरू असताना नवरदेवाचे वडील दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकलूज गावातून फिरत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले.
एकीकडे लग्नकार्याची धावपळ, उत्साह असताना भगत कुटुंबावर कोसळलेल्या संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगा, सून, नात व विवाहित तीन भाऊ असा परिवार असून, शोकाकुल वातावरणात राहत्या घराजवळ अंतिम संस्कार करण्यात आले.