उपमहापौर आत...दारावरची नोटीस गायब; सोलापूर महापालिकेने वकिलांना दिली दुसरी प्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 01:23 PM2021-01-20T13:23:21+5:302021-01-20T13:23:24+5:30
वादग्रस्त प्रकरण : खुलाशानंतर येणार बडतर्फीचा प्रस्ताव
सोलापूर : महापालिका प्रशासनाने वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांच्या घराबाहेर चिटकवलेली बडतर्फीची नोटीस गायब झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने काळे यांच्या वकिलांना या नोटिसीची दुसरी प्रत दिली आहे. या नोटिसीचा खुलासा आल्यानंतरच काळे यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासनाकडे जाणार आहे.
मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. काळे यांची भाजपनेही हकालपट्टी केली आहे. महापालिका प्रशासनाने काळे यांच्या नावे ४ जानेवारी रोजी बडतर्फीची नोटीस जारी केली. काळे तुरुंगात होते. त्यामुळे ही नोटीस त्यांच्या घराबाहेर लावण्यात आली. खुलासा करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी होता. हा कालावधी १९ जानेवारी रोजी पूर्ण झाला; परंतु यादरम्यान काळे यांच्या वकिलांनी नोटिसीची प्रत मिळाली नसल्याचा दावा केला. घराबाहेर लावलेली नोटीस गायब झाल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने काळे यांच्या वकिलांना दुसरी प्रत दिली. यावर काळे यांच्याकडून काय खुलासा येतोय याकडे लक्ष आहे.
नोटिसीने काही सदस्यांच्या प्रयत्नावर फेरले पाणी
महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. काळे प्रकरणाची माहिती प्रशासनाने सभागृहाकडे पाठविलेली नाही. यावरूनही प्रश्न उपस्थित होण्याची चिन्हे आहेत. काळे यांची सभागृहातून हकालपट्टी व्हावी यासाठी भाजपचे सदस्य प्रयत्नशील आहेत. नोटीस गायब झाल्याने या सदस्यांच्या इच्छेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.