तलाठी भाऊसाहेबांऐवजी शेतकरीच करणार पीक पेरणीच्या नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:36+5:302021-08-15T04:24:36+5:30
‘माझी शेती, माझा सातबारा, मीच भरणार माझा पीकपेरा’ या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी डेमो ॲप उपलब्ध केले आहे. ...
‘माझी शेती, माझा सातबारा, मीच भरणार माझा पीकपेरा’ या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी डेमो ॲप उपलब्ध केले आहे. यासाठी मंगळवेढा तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व तलाठी व कृषी सहायकांचे ई-पीक पाहणी संदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर व प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी ई-पीक पाहणी उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲपबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी
सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये पेरणी केलेल्या पिकांची पीकपेरणी ही स्वतः ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनमध्ये भरावयाची आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कोणते पीक पेरले याची नोंद होईल. तरी तालुक्यातील सर्व कृषी सहायक व तलाठ्यांनी समन्वयाने हे ॲप डाऊनलोड करून याबाबतची सविस्तर माहिती प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेवेळी शेतकऱ्यांची बैठक घेत त्यांना सविस्तर माहिती सांगावी, अशा सूचना दिल्या.
गैरव्यवहाराला आळा बसेल
१५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी ॲप उपलब्ध होणार आहे. हे ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करता येईल. मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक भरून पीक पेरणीची माहिती भरता येईल. त्यानंतर पिकांचा फोटो अपलोड करावा लागेल. या अहवालानुसार ७/१२ उताऱ्यावर पिकांच्या नोंदी होणार आहेत. यामुळे प्रत्येक हंगामातील पिकांखालील अचूक क्षेत्र कळणार आहे. यामुळे भरडधान्य खरेदीतील गैरव्यवहाराला आळा बसेल.
कोट ::::::::::::::::::::
ई-पीक पाहणीमुळे पीक पेरणी अहवालाचा रिअल टाइम क्रॉप डाटा संकलित होणार आहे. पीक पेरणीबाबतची माहिती ॲपद्वारा गाव नमुना क्रमांक १२ मध्ये नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे पीक पेरणी नोंदीत अचूकता येणार आहे. १५ ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत तलाठी, कृषी सहायक याबाबत ग्रामस्थांना प्रशिक्षण देणार आहेत.
- स्वप्निल रावडे
तहसीलदार, मंगळवेढा