विघ्नहर्त्याच्या उत्सवातही अपुऱ्या पावसाचं विघ्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:26 AM2021-09-22T04:26:03+5:302021-09-22T04:26:03+5:30
गेल्या काही वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना केल्यानंतर, दोन वर्षांत दमदार पावसाने बळीराजाला पाण्याची कमतरता भासली नाही. याही वर्षी चांगल्या पावसाची ...
गेल्या काही वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना केल्यानंतर, दोन वर्षांत दमदार पावसाने बळीराजाला पाण्याची कमतरता भासली नाही. याही वर्षी चांगल्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, सतत रिमझिम व अल्पशा पावसाने काही प्रमाणात खरिपाची पिके हाताला लागली आहेत. मात्र, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सध्या दमदार पावसाची आवश्यकता आहे. पावसाळी हंगामाचा काही अवधी शिल्लक असल्यामुळे या काळात पाऊस पडला, तरच भविष्याची चिंता राहणार नाही. विघ्नहर्त्याचा उत्सवात चकवा दिलेला पाऊस शेवटच्या टप्प्यात समाधानकारक होईल, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.
कायम पावसाळा
या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असले, तरीही ढगाळ हवामान रिमझिम पाऊस, यामुळे बहुतांश दिवस पावसाळी वातावरण तयार झाले होते. रिमझिम पावसामुळे दुष्काळी पट्ट्यातील गवत उगवले व फुलल्यामुळे डोंगर पठारावर हिरवळ दिसत आहे. याशिवाय मागील पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी चांगली आहे. यामुळे या वर्षी पाऊस नसला, तरी पावसाळी वातावरण कायम आहे.
पावसाळ्याचा आलेख
मे महिन्यात फक्त दोन दिवस पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात १९ दिवसांत १०३.४ मिमी पाऊस पडला, तर ११ दिवस निरंक म्हणून तर १४ जून रोजी २०.४ मिमी नोंद झाली. जुलैमध्ये १६ दिवसांत १००.१ मिमी, १५ दिवस निरंक, तर ९ जुलै रोजी १४.१ सर्वाधिक पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात १२ दिवसांत २९ मिमी, तर १९ दिवस निरंक म्हणून नोंद झाली. ३० ऑगस्ट रोजी सर्वाधिक ७.२ मिमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरावड्यातही नाममात्र पावसाची नोंद झाली.
----