३ हजारांत ५ लाख देऊन विमा कंपन्यांनी तारलं; रूम, बेड, डॉक्टर्स चार्जेस् ज्यादा लावून हॉस्पिटलनं लुटलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 03:44 PM2021-07-25T15:44:43+5:302021-07-25T15:44:50+5:30
कोरोनाची दुसरी लाट - शासनाच्या योजनांचाही झाला सर्वसामान्यांना फायदा
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ३ हजारांची आरोग्य विमा पॉलिसी देऊन तीन ते पाच लाखांपर्यंत हॉस्पिटल बिल भरले; पण शासन निर्णय असताना हॉस्पिटल प्रशासनाने रूम, बेड, डॉक्टर्स, नर्सेस्, लॅब टेस्ट यासह अन्य विविध प्रकारचे चार्जेस् लावून हॉस्पिटल प्रशासनानेच लुटल्याची धक्कादायक माहिती एका कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरोनाकाळात आरोग्य विमा कंपन्यांपेक्षा हॉस्पिटल प्रशासनाने उपचार खर्चात अचानकपणे वाढ करून रुग्णांची आर्थिक कोंडी केली. याच काळात शासनाच्या विविध आरोग्य योजनांनीही सर्वसामान्य रुग्णांना चांगली मदत केली. दरम्यान, शासकीय रुग्णालयात सर्वाधिक रुग्णांनी उपचार घेतल्यानेही अनेकांचे पैसे वाचल्याचे दिसून आले.
विमा रकमेत अशी झाली कपात
वास्ताविक शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे हॉस्पिटलने बिल आकारणे गरजेचे होते. त्यानुसारच आरोग्य विमा कंपन्या संबंधित रुग्णांना बिलाचे पैसे देतात. मात्र, हॉस्पिटल प्रशासनााने चुकीच्या पद्धतीने व अवाढव्य बिले लावल्याने आरोग्य विमा कंपन्यांनी ती स्वीकारली नाहीत. शासनाच्या नियमांप्रमाणे किंवा पॉलिसीमधील अटी व नियमांप्रमाणे संबंधित रुग्णांना बिलांचे पैसे अदा केले, खर्च जास्त अन् बिलाचे पैसे कमी हातात मिळाल्याने अनेक रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागली.
-------
यामुळे बसतो रुग्णांना फटका..
कोरोना रुग्णांचा विमा कॅशलेस असेल, तर संपूर्णपणे बिल हॉस्पिटल प्रशासन विमा कंपनीकडून वसूल करते. विमा कंपन्यांना हवे असलेले सर्व रिपोर्ट, बिले सादर केली जातात. मात्र, रिइम्बुसमेंट (खर्चाची भरपाई) फाइल सादर केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता होत नाही. त्यामुळे हॉस्पिटलचा झालेला खर्च अन् आरोग्य विमा कंपन्यांकडून दिली जाणारी खर्चाची भरपाई यात मोठी तफावत आढळून येते. त्यामुळे रुग्णांना आरोग्य विमा कंपन्यांकडून लुटले जाते, असे म्हणण्यात येते.
---------
असा वाढला खर्च...
- आरोग्य विम्यात समाविष्ट असताना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन, मेडिसिन बाहेरून आणायला लावण्यात आले होते.
- एका डॉक्टरांकडून वॉर्डातील १० ते २० लोकांना एकच पीपीई किट घालून तपासणी होते. मात्र, पीपीई किटचे १,००० ते ३,००० रुपये प्रत्येक रुग्णाच्या बिलात लावले जात होते.
- काही हॉस्पिटल प्रशासनाने कोरोना रुग्णांच्या बिलात बायोेमेडिकल चार्जेस्ही लावल्याचे एका रुग्णाने सांगितले.