सोलापूर शहरातील लोखंडी कचराकुंड्यांची परस्पर विक्री; शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:44 AM2019-02-14T10:44:37+5:302019-02-14T10:46:15+5:30
सोलापूर : शहरातील घंटागाड्यांचे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. कचरा संकलनासाठी शहराच्या विविध भागात ठेवण्यात आलेल्या लोखंडी कचराकुंड्यांची परस्पर विक्री ...
सोलापूर : शहरातील घंटागाड्यांचे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. कचरा संकलनासाठी शहराच्या विविध भागात ठेवण्यात आलेल्या लोखंडी कचराकुंड्यांची परस्पर विक्री झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला.
घनकचरा व्यवस्थापन आणि घंटागाड्यांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षकार्यालयात नगरसेवक देवेंद्र कोठे, राजकुमार हंचाटे, विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा, भारतसिंग बडुरवाले, प्रथमेश कोठे, रामदास मगर यांनी मुख्य सफाई अधीक्षक संतोष जोगधनकर, बी.पी. भूमकर, गिरीश तंबाके, मिटकॉनचे भाऊसाहेब तंबाके यांच्यासमवेत बैठक घेतली.
बैठकीनंतर नगरसेवक हंचाटे म्हणाले, यापूर्वी समीक्षा कंपनीकडे कचरा संकलनाचे काम होते तेव्हा ५१ घंटागाड्या, सहा ते आठ आरसी गाड्या, सहा डंपर होते. तरीही शहरातील कचरा बºयापैकी उचलला जात होता. सध्या महापालिकेकडे २२५ घंटागाड्या आहेत. तरीही शहरात अनेक ठिकाणी कचरा दिसतोय. कचरा संकलनासाठी ५०० छोट्या आणि मोठ्या लोखंडी कचराकुंड्या ठेवल्या होत्या.
घंटागाड्या सुरू झाल्यानंतर या लोखंडी कचराकुंड्या हटविण्याचे काम सुरू झाले. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजार परिसर आणि वर्दळीच्या भागात अद्यापही ५० कचराकुंड्या आहेत. तर ४५० कचराकुंड्या जुळे सोलापुरातील पाण्याची टाकी आणि कुमठा नाका येथील महापालिकेच्या जागेवर ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनी या जागेवर जाऊन पाहणी केली तेव्हा अनेक कंटेनर गायब असल्याचे दिसून आले. या कंटेनरची विक्री झाल्याचा संशय आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही हंचाटे यांनी केली.
डस्टबीन वाटपात अनियमितता
- स्मार्ट सिटी योजनेतून १ लाख डस्टबीन खरेदी करण्यात आले. त्यातील ९९ हजार ४८६ डस्टबीन आठ झोनमध्ये वाटप करण्यात आले. त्यातही काही प्रभागात जास्त तर काही प्रभागात कमी डस्टबीन वाटप करण्यात आल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी केला. शहरात उघड्यावर कचरा टाकणाºयांना दंड होतो. तसाच तो वेळेवर कचरा न उचलणाºया अधिकाºयांना व्हावा, अशी मागणी गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केली.