Interview ; करमाळा विधानसभाच माझे टार्गेट; युतीत नाही जमले तर अपक्ष : संजय शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:27 PM2019-02-05T14:27:56+5:302019-02-05T14:33:30+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची नुसती चर्चा सुरू आहे. मी कोणत्याही पक्षाकडे अद्याप उमेदवारी मागितलेली नाही. करमाळा विधानसभा ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची नुसती चर्चा सुरू आहे. मी कोणत्याही पक्षाकडे अद्याप उमेदवारी मागितलेली नाही. करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याचे माझे टार्गेट असून, यासाठी कोणाबरोबर जायचे हे अद्याप ठरविलेले नाही; पण युतीत नाही जमले तर अपक्ष लढण्याचे तयारी असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिले.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे संजय शिंदे यांचे नाव चर्चेत असल्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. भाजप पुरस्कृत मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो. या दिवसापासून मला भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून आग्रह धरला जात आहे. पण यात लोकसभा असे म्हटलेले नव्हते. सध्या जी चर्चा सुरू आहे, ती भाजप पातळीवर असू शकेल, पण मी अजून उमेदवारी मागण्यास कोणाकडे गेलेलो नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या काळात माझी भेट झालेली नाही. ते सोलापूर दौºयावर आल्यावरच एकदा भेटलो होतो. माझं टार्गेट विधानसभा आहे. त्यादृष्टीनेच मी गेल्या चार वर्षांपासून तयारी करीत आहे. भाजप-सेना युती झाली तर करमाळ्याची जागा सेनेच्या वाट्याला जाणार आहे. सध्या कोणत्याही पक्षाचे आघाडीबाबत स्टॅण्ड झालेले नाही. हे एकदा स्टॅण्ड झाले की मग कोणाबरोबर जायचे हे मी ठरविणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
मागील वेळेस महाआघाडीतर्फे निवडणूक लढविली होती, या वेळेस कसे असे विचारले असता शिंदे म्हणाले की, सदाभाऊ खोत सध्या भाजपबरोबर आहेत. मी विधानसभेसाठी इच्छुक असल्याने महादेव जानकर यांनी रासपतर्फे निवडणूक लढविण्याची आॅफर यापूर्वीच दिली आहे. युती, आघाडीत जागा मिळाली नाही तर मी अपक्ष लढणार आहे.
शरद पवार माढ्यात लढू शकतात!
गेल्या आठवड्यात प्रभाकर देशमुख माझ्याकडे आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तुमची आठवण काढली होती, असे सांगतानाच माढा लोकसभेसाठी माझी शिफारस करा, असे ते म्हणाले होते. राष्ट्रवादीतर्फे अनेकांची चर्चा असून, एखाद्वेळेस शरद पवार हे स्वत:च या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे संजय शिंदे यांनी सांगितले.